ही टकली
फुलविल तोंडे जी सुकली।।ही.।।
गरगर फिरते भिंग्रीवाणी
सूत भरभर काढुन आणी
स्वातंत्र्याची गाते गाणीं
पारतंत्र्याचे वेढे ही उकली।।फुल.।।
लहान परि करि काम महान
संसारांतिल पुरविल वाण
असे सुखाची केवळ खाण
संधि सोन्याची आणिल जी चुकली।।फुल.।।
फिरून आणिल आबादानी
फिरून आणिल दाणापाणी
हिच्याविणें तुम्हि रहा न कोणी
आणिल संपत्ति पुनरपि जी हुकली।।फुल.।।
आळस दवडा झांपड उडवा
येतां जातां टकळी फिरवा
गांधिबाप्पाचा कित्ता गिरवा
सुखि होतील सुखाला जीं मुकली।।ही.।।
ही गाणी मुले टिपून घेत. कोणी कातायला शिकत. मधूनमधून शेतकरी येत त्यांच्याशी चर्चा होई, त्यांना माहिती देत. आता गांधबाप्पा कोठे आहेत, जवाहरलाल काय करतात, असे त्यांचे प्रश्न असत. मुले माहिती देत आणि मग रात्री ते नाट्यप्रवेश. सा-या गावांत उत्साह येई. सावकाराच्या प्रवेशात पंढरीशेटचा मुलगा काम करी. “शेतक-यांनो, आधीं पोटभर जेवा, मग सावकाराला उरले तर द्या. आधी तुमचा हक्क. ज्याच्या हाताला घट्टे पडले त्याचा हक्क. म्हणून सकाळी आपण हात पाहतो, की या हाताला घट्टे पडलेले आहेत की नाही, याला खायचा अधिकार आहे की नाही? श्रमणा-याचा प्रथम अधिकार, मग बांडगुळांना.” असे तो म्हणे व टाळ्यांचा कडकडाट होई.