“तुमची अब्रू सांभाळण्यासाठी. आईचे रडणे थांबविण्यासाठी. मी का पाठीस लागलो होतो तुमच्या की लग्न करा, लग्न करा म्हणून? तुम्ही मला बांधून जणु नेलेत. तेथे उभे केलेत. केवळ का मुले उत्पन्न करणे एवढेच कर्तव्य? त्या मुलांनी मी काय देऊ? कोणते विचार देऊ? तुम्ही मला चार दिडक्या ठेवल्यात. ही पापी सावकारी ठेवलीत. माझ्या मुलांना मी अधिक काही देऊ इच्छितो. त्यांच्यासाठी मला अन्यायाची संपत्ति ठेवायची नाही. परंतु माझ्या मुलांना विचारांची संपत्ति देण्याची मला इच्छा आहे; परंतु मजजवळ असेल तर मी देईन ना? आपल्या संततीला सद्विचार देता आले पाहिजेत. तुम्ही आम्हांला काय दिलेत बाबा? भरपूर व्याज कसे घ्यावे, खोटे जमाखर्च कसे लिहावे, गरिबांच्या अश्रूंना कसे हसावे, त्यांची घरेदारे कशी सहज जप्त करावी हे शिकवलेत. दुसरे काय दिलेत, सांगा ना? ते दयाराम भारती भेटले म्हणून तुमचा मुलगा माकडाचा थोडा मानव झाला. मानवाचा थोडा देव झाला; देव नाही पण मानव तरी झाला. तुम्ही काय दिलेत? माझ्या मुलांना मी अधिक देऊ इच्छितो. विचारांचे धन देऊ इच्छितो. ते विचारधन हिंदुस्थानभर हिंडून मला गोळा करून आणू दे. व्यापारी हिंदुस्थानभरचा माल येथे आणतात व विकतात. मलबारचा नारळ आणतात, कानपूरची डाळ आणतात, रंगूनचा तांदूळ आणतात. परंतु विचार कोण आणील? मी विचारांचा व्यापारी होईन. विचारांची संपत्ति गोळा करीन, भरपूर वाटीन. माझ्या मुलांना देईन. म्हणून मी जाऊ इच्छितो. हिंदुस्थानातील आश्रम पाहीन. भारताचा आत्मा पाहून येईन. जुनी नवी संस्कृति पाहून येईन. बाबा, तुम्ही हे दिडक्यांचे धन दिलेत. परंतु हे वैचारिक धन मला कोण देणार? ते मलाच हिंडून फिरून मिळवू दे. बाबा, रागावू नका. मला आशीर्वाद द्या. म्हणा की जा जगन्नाथ, खरा माणूस होऊन ये. मनानें, बुद्धीने, हृदयाने खंबीर व गंभीर, विचारी व ध्येयवादी होऊन ये. तुम्ही मला प्रेमाने वाढवलेत. माझा देह प्रेमाने पोसलात. आता माझ्या आत्म्याचे पोषण व्हावे, मनोबुद्धीचे पोषण व्हावे म्हणून नाही का प्रेम दाखवणार? बाबा, ते खरे प्रेम की जे बांधून नाही ठेवीत, जखडून नाही ठेवीत, विकासाच्या आड नाही येत, पंख नाही कापीत, भावना नाही गुदमरवीत, असे ते मोकळे प्रेम, ते उदार प्रेम मला द्या. मी तुमच्या पाया पडतो.”

असे म्हणून जगन्नाथ पित्याच्या पाया पडला. परंतु पिता म्हणाला, “जगन्नाथ, आम्हांला काय कळते? मुर्ख हो आम्ही. आमचा अपमान करावा एवढ्यासाठी का रे तुला वाढविले? कृतघ्न आहे जग.”

“बाबा, नाही हो तुमचा जगन्नाथ कोठे जात. तो वरच्या खोलीत बसून राहील; तेथे पडेल, रडेल, सडेल, झडेल.”

असे म्हणून जगन्नाथ दु:खाने निघून गेला. आपल्या खेलीत जाऊन बसला. त्याने गुणाच्या फोटोकडे पाहिले. आज गुणा असता तर? त्याच्याजवळ मी माझे दु:ख सांगितले असते. माझे हृदय तो जाणी, तो ओळखी. तो उठला. गुणाच्या त्या घरी गेला. गुणाच्या खोलीत जाऊन त्या सुंदर फोटोसमोर बसला. त्याने एक गाणें म्हटले.

दु:ख मला जें मला ठावें
मला ठावें मला ठावें ।।दु:ख।।

दु:ख मनीं जें कोणा समजे
आंत जळुन मी अहा जावें ।।दु:ख।।

मदश्रु हे ना कळती कोणा
बसुन स्वत:शी विलापावें ।।दु:ख।।

प्रेमळ मित्रा, तूंची त्राता
मज हंसवाया झणी यावें ।।दु:ख।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel