मोटारीत जगन्नाथ गुणाचे हात हातात घेई व आपले तोडे त्याच्या हातात घाली.
“माझे लग्न होईल तेव्हा घाल हो.”
“कधी होईल तुझे लग्न?”
“बाबा करतील तेव्हा.”
“तुझ्या लग्नांत मी येईन. तुला नटवीन.”
“म्हणजे रानटीपणा तूंहि करणार एकूण? मला तुझ्या प्रेमाने नटव म्हणजे पुरे.”
वाटेत तापी नदीवर त्यांनी फराळ केले.
“गुणा, पोहायला येतोस?” जगन्नाथने विचारले.
“ही वोळ पोहण्याची नाही.” तो म्हणाला.
“मग केव्हा येईल गुणा?”
“लग्न झाल्यावर पुढे. केवळ मग संसारांत बुडता की मान वर राहते ते दिसेल.”
“गुणा, आपण पुढे खूप काम करू.”
“करू. गरिबांचे संसार सुखी होण्यासाठी झटू.”
सारे व-हाड शिरपूरला आले. लग्नघाई सुरू झाली. खादीच्या टोपीतच नवरदेव वधूमंडपाकडे चालला. सनातनी लोक रागावले. वधूकडचे लोक संतापले. परंतु जगन्नाथचा निश्चय अभंग होता. खादीचीच गुलाबी शाल त्याने अंगावर घेतली. शालू, शेला त्याने भिरकावला. रागारागाने बोलणी झाली. परंतु नवरदेव शांत, गंभीर होता. शेवटी विरोध मावळले. नवरदेव आला. टाळी लागली. माळा गळ्यांत पडल्या.