देशभक्तीची, त्यागाची ज्योत पेटवणारे ते अण्णासाहेब दास्ताने, ते बाळूभाई, ते ठकार! मानाची नोकरी सोडून देशाला जीवन देणारे व तरुणांना वेड लावणारे त्यागमूर्ति धनाजी नाना! ते सेवापरायण सुकाभाऊ व छातीवर लाठीमार घेणारे सितारामभाऊ व रक्ताने रंगणारे वीर मल्हारी! तुरुंगात असताना प्रिय पत्नी मरण पावली व त्यानंतर वैराग्याने राहणारे सत्यमूर्ति शंकरभाऊ व त्यांच्या उदाहरणाने पेटलेले सिताराम, पंढरी वगैरे मारवाडी युवक! “मारवाडी सावकाराची पापे धुवायला आमच्यासारख्यांनी पुष्कळ वर्षे बलिदान केले पाहिजे, तेव्हा कोठे थोडे प्रायश्चित्त घेतल्यासारखे होईल.” हे शंकरभाईचे बोल. आणि एके काळी सावकारांना दरारा बसवणारे परंतु आता केवळ अहिंसामय बनलेले, निर्भय, कष्टाळू, नि:स्पृह व त्यागी हरिभाऊ चव्हाण! तुरुंगांत त्यांनी भंगीकाम मिळावे म्हणून सत्याग्रह केला. तुरुंगातील फत्तरगाडीवाल्यास मे महिन्यांतील उन्हांत तीन तीन फे-या करायला लावील त्या बंद पाडणारे, फत्तरगाडीच्या लोकांस पायांत चपला द्या असे सांगणारे, नाही तर उपवास करतो म्हणणारे असे ते हरिभाऊ! सण असला तरी गोड पोळी नको म्हणणारा गोविंदा, आणि सेवेशिवाय ज्यांना सुख नाही ते सखारामभाऊ! आणि ते नवलभाऊ! त्यागी व ज्ञानाची लालसा असलेले! नि:स्पृह व कष्टाळू! आणि गुजरमंडळींत ज्योत पेटवणारे ते स्वर्गीय बभूता गुलाल व त्यांचे काम पुढे चालणारे त्याचे पुत्र मंगेशभाई, शंकरभाई वगैरे तरुण! कामगारांत नवजीवन ओतणारे भाई नथुभाऊ, आंबोडेकर वसंतराव भागवत वगैरे त्यागमूर्ति! साक्षरतेचे वेड लागलेले गंधे! प्रकाशमंडळे स्थापणारे बालमूर्ति मोहाडीकर व त्यांचे सहकारी! आणि दारू पिणारे, परंतु गांधीजींची दांडी यात्रा पाहून विरक्त झालेले, गांधी टोपी मिळावी म्हणून पायी ४० कोस जाणारे ते सत्याग्रही व निष्ठावंत नथुसिंग—किती ज्ञात, अज्ञात स्त्रीपुरुष खानदेशांत कामे करीत आहेत! ठिकठिकाणी युवकमंडळे, तरुणसंघ, प्रकाशमंडळे, अभ्यासमंडळे व विद्यार्थीसंघ निघत आहेत. खादीसेवासंघ, हरिजनसेवासंघ, कामगार युनियन्स, किसानसंघ निघत आहेत. खानदेश नवा इतिहास निर्मित आहे.

महात्माजींच्या शेगांवभोवती आज सारे राजकारण व विधायक काम केंद्रीभूत झाले आहे. तेथे पूज्य विनोबाजींना जास्तीत जास्त कार्यकर्ते कोठून मिळाले? खानदेशने दिले. खानदेशचे सुकाभाऊ, खानदेशचे सखारामभाऊ, खानदेशचे चावदासभाऊ! खानदेशचा विणकर—कार्याचा प्रमुख देवीदास, खानदेशचा चर्मालयांतील तज्ज्ञ प्रेमळ भिका; खानदेशचा पंढरी, विरक्त व निरहंकारी!

पूर्वीचा इतिहास व नवीन इतिहास! खानदेशांत चैतन्यज्योत आहे. परंतु मी नाही का या कामांत भाग घेणार? मी का या परंपरेपासून तुटणार? मी का कोठे तरी दूर जाणार? माझा प्रिय, पूज्य खानदेश!

गुणाच्या डोळ्यांत पाणी आले. खिडकींतून धारा खाली गळत होत्या. जणुं खानदेशच्या भूमीला तो भक्तीप्रेमाची अर्घे देत होता. अश्रूंची फुले वहात होता. त्याने डोळे पुसले. त्याने सारंगी काठली. हृदय भावनांनी भरून आले की कलेचा आश्रय करावा. कलेच्याद्वारां भावना ओताव्या व हृदय हलके करावे! गुणाने सारंगी घेतली. तो वाजवू लागला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel