इंदूर म्हटले म्हणजे किती तरी जुन्या आठवणी येतात. मराठी इतिहासांतील आठवणी. सरदार मल्हाराव यांच्या आठवणी, देवी अहिल्याबाईच्या पवित्र आठवणी. अद्यापहि इंदूरमध्ये गेले की महाराष्ट्रियाला जरा आपलेपणा वाटतो, आपण आपल्या हक्काच्या जागी आहो असे वाटते. संस्थानी थाटमाट अद्याप तेथे आहे. पूर्वीचे चे स्वतंत्र व पवित्र वैभव आता नाही. आता उसने वैभव, मिंधेपणाचे वैभव! साम्राज्यशाहीच्या गुलामगिरीचे वैभव! इंदूरमधील मोठमोठे राजवाडे पाहून प्रसन्न नाही वाटत. कोणत्याही संस्थानात जा. तेथले राजवाडे पाहून एक प्रकारचा उद्वेग व संताप विचारी मनाला आल्याशिवाय रहात नाही. या राजवाड्यांतून काय असते? विलायती सामाने भरलेली असतात. विलायती सामानांची जणु प्रदर्शने. प्रत्येक खोलीत आरसे, पलंग, खु्र्च्या, कोचे! यांशिवाय वस्तु दिसणार नाही. सर्वत्र विलायती विलासांचे प्रदर्शन. त्या सामानाला काडी लावावी असे वाटते. त्याच त्या वस्तु सा-या खोल्यांतून ठेवलेल्या. राजांचे राजवाडे असे व श्रीमंतांचे बंगलेहि त्याच प्रकारचे. इंदूरला एक कोट्याधीश शेट आहेत. त्यांनी काचेची मंदिरे बांधली आहेत. जैन पंथी मंदिरे. त्या शेटजींच्या गिरण्या आहेत. त्या गिरण्यांतील कामगारांस रहायला नीट झोपडीहि नाही
बिळात उंदीर राहतात तसे कामगार राहतात! अहिंसाधर्माच्या या कुबेराने लाखो रुपये खर्चून परदेशी बिलोरी काच आणून हे मंदिर बांधले! हा फुटका धर्म आहे. काच खळकन् फुटते तसा हा धर्म आहे. असल्या असल्या धर्मात त्राण नाही, प्राण नाही. मानवी जीवन सुंदर करू न पाहणारा धर्म तो राक्षसी धर्म. अहिंसक धर्माचा खरा उपासक तो जो जगांतील हिंसा, जगांतील मरण, जगांतील हायहाय, दु:ख, जगांतील अन्याय दूर करण्यासाठी उभा राहतो. परंतु अहिंसाधर्माचे अनुयायी सर्व हिंदुस्थानांत आज श्रीमंत आहेत. ही श्रीमंती कोठून आली? कशाने आली? हिंदुस्थानभर दारिद्र्य आहे व जैन मंदिरांतून कोट्यावधि द्रव्य कुजत पडले आहे. देवाच्या दरवाजांना मोठमोठी कुलुपे आहेत. अहिंसाधर्माच्या मंदिरांना बंदुका हातांत घेऊन शिपायी सांभाळित आहेत! ते धर्माला नाही सांभाळीत तर संपत्तीला सांभाळीत आहेत. हिंसेने गोळा केलेली संपत्ति! लोकांची मरणे पाहूनहि गोळा केलेली संपत्ति. लोकांना खायला नाही व देवांना सोन्याचे रथ आहेत व त्यांना सांभाळावयास पोलीस उभे आहेत!
सा-या जगांत असे आसुरी संपत्तीचे, हिंसाधर्माचे नमुने आहेत. इंदुरातहि होते, परंतु केवळ पापावर दुनिया चालत नाही. जो पुण्याचा अंश आहे, जो सद्भाव आहे, जी उदारता आहे, सहानुभूति आहे, त्याच्या आधारवर जग चालत असते. इंदुरात अशी काही पुण्यस्थळे असतील. पुण्यसंस्था असतील. उदार व निर्मळ माणसे असतील. त्यांच्यामुळे इंदूर जगत होते, मान वर करून उभे होते. श्रीमंताच्या उंच मनो-यांनी इंदूरची मान उंच नव्हती. त्या शहरांत जे कोणी थोर मनाचे लोक होते, उच्च वृत्तीची माणसे होती, त्यांच्यामुळे इंदूरची मान उंच होती. अशा ह्या इंदूर शहरांत आता गुणा जाणार होता. आगगाडीत भेटलेल्या त्या सदगृहस्थांकडे जाणार होता. आपले आईबाप घेऊन जाणार होता. मनोहरपंत त्याचे नाव. ते एक पेन्शनर गृहस्थ होते. पन्नास वर्षांचे त्याचे वय होतें. नेमस्त व निर्व्यसनी राहणीमुळे त्यांची शरीरप्रकृति निकोप होती. ते रुबाबदार व तेजस्वी दिसत.
त्यांचा वाडा होता. स्वत:चा वाडा. त्या वाड्यांत काही बि-हाडे होती. भाड्याचे उत्पन्न येई. मनोहरपंतांच्या पत्नीचे नाव रमाबाई. रमाबाईंना पाच मुले झाली. परंतु ऐकच जगले. इंदु फक्त जगली. इंदु आईबापांचा प्राण होती. ती आता इंग्रजी शाळेत जात होती. आपल्या मुलीने इंग्रजी शाळेत जावे हे रमाबाईंना पसंत नव्हते. परंतु मनोहरपंतांनी तिची समजूत घातली व इंदूचे शिक्षण सुरू झाले.
इंदु शिवणे, टिपणे शिकली होती. तिला भरतकाम चांगले येई. कितीतरी चित्रे तिने भरली होती. ती पेटी वाडवी. थोडे गातहि असे. गायनाच्या वर्गाला ती जात असे. मनोहरपंतांना संगीताचा फार नाद. त्यांचा नाद इंदूलाहि लागला. घरी रेडिओ घेण्यांत आला होता. शिवाय फोनो होता. अत्यंत वेचक व निवडक अशा प्लेटी त्यांच्या घरी होत्या.
इंदूला ती सारी गाणी पाठ झालेली होती. तिला इतर काही उद्योग नसला म्हणजे ती त्या प्लेटी लावीत बसे. तोच एक जणु तिचा आनंद दिवाणखानी आनंद.
“इंदु, ते वाजवणारे येणार आहे. त्यांचे पत्र आले आहे.”