“जगन्नाथ, गिरीचा बालाजी बघावयाचा राहिलाच.”

“आतां आमचे पंढरपूर पहायला चल. आषाढी एकादशी जवळ येईल. वरून पाऊस पडत असतो. आकाशांतून देवाचा पाऊस, खाली भक्तिप्रेमाचा पाऊस. वरती मेघांचा गडगडाट, खाली टाळ मृदंगाचा उचंबळवणारा, निनादणारा नाद ! चंद्रभागा दुथडी वहात असते. नावा नाचत असतात. दिंडीला दिंडी लागलेली असते. चल पंढरपूरची मौज पहा.

सुखासाठी करिसी तळम
तरि तूं पंढरीसी जाई एकवेळ

असें महाराष्ट्रांतील संत सांगतात. कावेरी, चल, खरेंच आपण जाऊं.”

“आणि गिरीच्या बालाजीला केव्हां जायचे. ? कसा सुंदर टेकडीवर उभा आहे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामील या चारींच्या मध्यें बालाजी उभा आहे. जणुं चारांना एकत्र करीत आहे. चारी हातांनी चौघांना धरीत आहे.”

“गिरीचा बालाजी खूप श्रीमंत आहे होय ना ?”

“हो,. इतका संपन्न देव क्वचितच असेल. हा देव सावकारी करतो. व्यापारी येथून व्यापारासाठीं रकमा नेतात व परत करतात, कोर्टकचेरी लागत नाही. मुक्या देवाची सुखी सावकारी.”

“आणि पंढरपूरचा विठोबा असाच. पंढरपूरचा विठोबा म्हणजे भोळ्या भाबड्या शेतक-याची देवता. ती वाळूची ओबड धोबड कशी भक्कम मूर्ति आहे ! अशा त्या ओबडधोबड मूर्तीलाच संतांनी राजस सुंदर मदनाचा पुतळा म्हणून आळविलें. शेतकरीच सर्वांत सुंदर. सृष्टीला सुंदर करणारा, हिरवीगार करणारा. तो सुंदर नव्हे तर का सावकार सुंदर ? पंढरपूरच्या विठोबाच्या डोक्यावर भलें मोठे पागोटे असतें. असा हा विठोबा आज शतकानुशतकें उभा आहे. श्रीशंकराचार्य आले व त्यांनी पांडुरंगाष्टक लिहिलें. परंतु कावेरी हें विठ्ठल दैवतहि तुम्ही तुम्हींच दिलेलें असावे. त्याच्या कानांत मकरकुंडलें आहेत. आणि माशाच्या आकाराची कुंडलें तुम्ही द्राविडीच कानांत घालतां. महाराष्ट्राचें सर्वश्रेष्ठ दैवत तुम्ही आम्हांस दिले आहे. चल त्याला पहायला. चल त्याला भेटायला. पांडुरंग, हा विठोबा, म्हणजे महाराष्ट्राचा मुका अध्यक्ष. लाखों वारकरी येतात, नाचतात, जातात. या वारक-यांच्या संस्थेला अध्यक्ष कोण ? हा विठोबा. किती वर्षे अध्यक्षत्व करीत आहे ! चल त्याला भेटायला. चल पंढरीच्या यात्रेस जाऊं, नाचूं”

“जगन्नाथ, या जुन्या यात्रा सोडून आपण नवीन यात्रा कधीं करूं लागणार ? आतां सेवाग्रामला महात्माजींच्या यात्रेला जावें. किंवा मुंबई, कानपूर, वगैरे ठिकाणी जाऊन कामगार बंधूंच्या लाल संघटना बघाव्या. किंवा बिहारमध्यें जावे. जयप्रकाशची किसानसंघटना बघावी. पंजाबांत जावे व जालियनवाला बागेचे दर्शन घ्यावें. मुंबईचे आझाद मैदान बघावे. नवीन काळी नवीन तीर्थक्षेत्रे नको का व्हायला ?”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel