माझे कुळीची कुळस्वामिनी । विठाई जगत्रय जननी ।
येई वो पंढरपूरवासनि । ठेवीले दोन्ही कर जघनी ।
उभी सखी सजनी ॥ १ ॥
येई पुंडलिक वरदायिनी ।विश्वजननी । रंगा येई वो ॥ धृ. ॥
मध्ये सिंहासन घातले । प्रमाण चौक हे साधले ।
ज्ञान कळस वर ठेवले ।
पूर्ण भरियले । धूप दाविले दंड । सुवासे करूनि ॥ २ ॥
सभा मंडपो शोभला । भक्ती चांदवा दिधला ।
उदो उदो शब्द गाजला ।रंग माजला ।
वेद बोलला । मूळचा ध्वनि ॥ ३ ॥
शुक सनकादिक गोंधळी । जीव शीव घेऊनी संबळी ।
गाती हरीची नामावळी
मातले बळी । प्रेमकल्लोळी । सुखाचे सदनी ॥ ४ ॥
ऎसा गोंधळी घातिला । भला परमार्थ लुटिला ।
एका जनार्दनी भला । ऎक्य साधिला ।
ठाव आपुला । लाभ त्रिभुवनी ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.