जोहार मायबाप जोहार । माझें नांव आत्मनाक महार । माझा जालीम कारभार । धन्याचें रजेनें करतों की जी मायबाप ॥ १ ॥
ममताई आवा पाटलीण मोठी । थोरा नायकाची बेटी । मनाची निर्मळ नोहे खोटी । लक्षलक्षापती येती तिचे भेटी की० ॥ २ ॥
मानभाव जती सती । तडी तापडी अपारमती । माझे धन्याचे घरा येती । धन्यावर जोर जप्ती करूं पाहाती की० ॥ ३ ॥
दोघे कारभारी जोड यांची । मोकाशा म्हणविती सृष्टीची । तिही वरती केली वरच्या गांवींची । खबर घ्यावया खालील गांवठाण्याची ।
मज रवाना केलें की० ॥ ४ ॥
झडुनी पडली गळां । तुकडा दिला पाका शिळा । याबद्दल तुमचें स्थळां । आलों की० ॥ ५ ॥
शिव शेटियासी जोहार । शिवाजी चौगुल्यासी जोहार । वैष्णव कुळकर्णी यासी जोहार । तुमचा कारभार जड दिसतो की० ॥ ६ ॥
सारी पांढर वोस पडली । थोर थोर कुळें दूर गेलीं। नवद्वारें कैसीं नागविलीं। संतति आपुले पोटीं पुरती की० ॥ ७ ॥
हुजूर धन्यास राग जाईल फार । मोठे धाडतील वरातदार । इज्जत घेतील करतील कहार । मग वारंवार आठव होईल की० ॥ ८ ॥
नेऊन घालतील बंदिखानीं । तेथें सोडावया नाहीं कोणी। अविद्या मारील हालहाल करुनी । ही फजिती सरेना की० ॥ ९ ॥
यमाजी वाजी हुद्देदार । त्याचा तो जिवावरील मार । जो घडला नाही हा विचार । तों दरबार शुद्ध करा की० ॥ १० ॥
पंचवीस कुळे धरा बिगारी । गांवांतील जमीन वजवा सारी । गजगिरी करा नवद्वारीं । धन्याची निशाणीं लावा की० ॥ ११ ॥
महामूर करा पेठा चारी । चौमहाजनासहित श्रीपाद घ्या वरी । धन्याचे नांवाचा कउल शिरीं । साच चढवा की० ॥ १२ ॥
अक्षय्य वास एक चित्त करा । फळावर फिटेल सारा दोरा । पहिल्या खातासी दूर करा । नाहीं तरी कानीं उबा पडेल की० ॥ १३ ॥
ब्रह्माजी पाटील यासी सांगा जोहार । पाटलीण आवाचा वेजाजा जाला फार । अवघा गांवगुंडी कारभार । आवाजी करिती की० ॥ १४ ॥
आवाजीची साच वेसन खोटी । राबती करा संदेहे रोटी । सहज कारभाराची आटाआटी । मज नफरासी उजवे दिठी । पाहूं नका की० ॥ १५ ॥
कामाधामाचा उल्लंघ करतों । आल्यागेल्यासी जबाब देतों । सार्या रयतेचीं घरें राखितों । हे कष्ट सान की जी मायबाप ॥ १६ ॥
कितीकांसी लांकडें द्यावीं । शिंग शिंपुटी म्यांच पुरवावी । फजिती फजिती राबनुकीची सोसावी । ही गोष्ट सान की० ॥ १७ ॥
मेखा पायबंद तोबरे माथां । जीव कष्टला बिगारी वहातां । चौर्यांयशी लक्ष गांवें हिंडतां । हें दुःख सान की० ॥ १८ ॥
कुळवाडी थोटपणाशीं आले । बलुते देईनासे झाले । पांढर टाकुनी पळाले । तरी मिराशीचें लिगाड की० ॥ १९ ॥
न होईना मातीचा पेंडुळा । जनोबा खायाचा मायंदळा । रजा घेउनी पूर्वस्थळा । जाईन की० ॥ २० ॥
मिरास सर्वस्व कळली । पाटलीण आवा धनीन जाली । दिवाणदाराचीं तोंड मारलीं । तेथें आमुचा पाड काय की० ॥ २१ ॥
मिरास सर्वस्व कळली सारी । हांक घेउनी जाईन गडावरी । रामजी बावाचे दरबारीं । हकीकत सारी सांगेन की० ॥ २२ ॥
कोणी म्हणती देऊं लांचा । मी नव्हे आजकालचा । झाला वृत्तान्त साचा । तो वडिलासी सांगेन की० ॥ २३ ॥
खालीं गांवीं पाटलीण आवा विवसी । ती आलिंगूं न दे साहेबासी । सारे म्हणती मोकासी । आम्हांस तिजपाशीं कां धाडितां की० ॥ २४ ॥
पांचजण लहान लहान पोरें । ते आडकती पडती नवा द्वारें । साहेबाचें नाम सारें । स्वप्नीं न घेती की० ॥ २५ ॥
दोघे तिघे ब्राह्मण मेळविली । तेणें परमुलखाची रांडोळी केली । धन्याचे नांवची निशाणी उरूं दिली नाहीं की० ॥ २६ ॥
पाटीलबोवा स्वप्नीं गुंतले । कारभार टाकुनी लाजिरे जाले । जोगी मोकासी होऊनि गेले । या ममताई आवाच्या भेणें की० ॥ २७ ॥
आणिक मेळविले दैवतें । खबर सांगो आलीं साहेबातें । घरोघर पूजिती भूतें । त्यांची नावें ऐका की० ॥ २८ ॥
वासना मांगीण मातंगिणी । कामना जळीं मायराणीं । अभाव भांगड भूत जोगीनी । त्यांसी नग्न पूजिती की० ॥ २९ ॥
वीर झोटिंग नरसिंग वेडा । वेतळाचा पूजिती खोडा । शेंदूर माखोनियां धोंडा । शेळी बोकड जीव घेती की० ॥ ३० ॥
मेल्या मनुष्यासी पूजिती । खोड सुपल्या पाळणे बांधिती । गळ टोंचोनि बगाडे घेती । ही फजिती सान की० ॥ ३१ ॥
जीवदान देऊं करिती । अवघीं दैवतें एकची म्हणती । मेंढरें बोकडे मारिती । परतोनी आपणची खाती की० ॥ ३२ ॥
नैवेद्य नारळ नेउनी फोडिती । खोबरें एकमेकांसी वांटिती । नुसती नरोटी देवापुढें ठेविती । लटिके धूप दाउनी चाळविती की० ॥ ३३ ॥
जाउनी देवऋषी आणिती घरां । त्याकुन लावितां चुलींतील अंगारा । उफराटे पराचा कोंबडा खैरा । निंब नारळ उतारा की० ॥ ३४ ॥
आणिक खापराचे भदाडें । तें चुन्याचें पांढरें लाउनी चहूंकडे । दिवस मावळल्याचें पुढें । तिकटण्यावर ठेविती की० ॥ ३५ ॥
दावलमालकाची पूजिती गदा । वर्षातून फकीर होतीं एकदा । मग डोला होतां थंडा । खाती मलिदा हिंदु तुर्काचें खरकटें की० ॥ ३६ ॥
भेणें भेणें साहेबाला स्मरती । त्याला पाटलीण आवाची द्वाहीं देती । ऐशी मुलखाची गती । ती धन्याप्रती सांगों आलों की० ॥ ३७ ॥
साहेबाचे हुकुमावर गेलों । प्रवेश पाहून दंग जालों । वागवेना मग आलों पायपुसा जवळ की० ॥ ३८ ॥
मग धन्यानें मज आत्मनाकाला । भाग भागला म्हणोनी हुंकार केला । येथें राहे म्हणती की० ॥ ३९ ॥
ऐशी निर्धारी केली । बांडी सान घोंगडी दिली । दिठी देउनी सांगितली । नजरेवेगळा राहूं नको की० ॥ ४० ॥
जाउनी जनार्दनबावाचे दरबारीं । राहिलो एकनाथ परचारी । जुगानुजुगाची चाकरी । कोण्ही दूर करी ना की जी मायबापा ॥ ४१ ॥