जोहार मायबाप जोहार । मी निराकारीची महारीण साचार । सांगतें तुमचे नगरीचा विचार । ऐका की जी मायबाप ॥ १ ॥
माझ्य़ा धन्यासी रुजु होउनी । जिवाजी जाहले गांवचे धनी । गांवची बुडविली लावणी । आतां केविलवाणी दिसती की० ॥ २ ॥
गांवांत रहाती बारा पंधरा । जिवाजी घेती त्यांचा सारा । परी धन्याचे कऊल विचारा । न करिती की० ॥ ३ ॥
शिवाजीसी सदा समाधी । जिवाजी नेमिले कारभारी मधीं । आधीं धन्याचे बाकीचे संधी । जवळ आली की० ॥ ४ ॥
मग तोंडा माखोनी काळें । जिवाजी रानोरान पळे । मागें धांवती यमाजी बळें । परी तलब न सुटे की० ॥ ५ ॥
तलब यमाजीची मोठी । जिवाजीस न मिळे लंगोटी । धन्याची बाकी शेवटीं थकली की० ॥ ६ ॥
बाकी थकली जिवाजीकडे । पायीं घालती जन्मांचें खोडें । मग जिवाजी धडधड रडे । परि बाकी न सुटे की० ॥
एका जनार्दनीं विचार । करूनि महारिणीचा जोहार । तेणें पावाल पैलपार । नाहीं तरी फेरा चौर्यांयशीचा की जी मायबाप ॥ ८ ॥