माझा टिळा माझा टिळा । धाक पडे कळिकाळा । चौघांचा करूनि गुंडाळा । शेष पाताळी घातला कीं ॥ १ ॥
टिळ्यानें दाविलें कैलास । केला गंधर्वाचा नाश । धाक दरारा इंद्रचंद्रास । सुख लागलें तेव्हां ध्रुवास ॥ २ ॥
हा टिळा कोणाचा जाणे हा टिळा शुद्ध चैतन्य नीतीनें । महत विष्णु म्हणती जाणें । हा टिळा रेखिला यानें ॥ ३ ॥
माझ्या टिळ्यापासून । आकाश पाताळ कैलास । तत्पर असेल त्यांत कोण । सुंदर सगुण निरूपण ॥ ४ ॥
हा टिळा शोधून जातां । न ये ब्रह्मादिकांच्या हाता । त्याला नाहीं मातापिता । मग कैंचा काका चुलता ॥ ५ ॥
ह्या टिळ्याची ऐका खूण । विरंची करी ध्यान । ज्यापासून झाला उत्पन्न । केलें वेदाचें खंडण । चारी मुक्ती साधिल्या त्यानें ॥ ६ ॥
टिळ्या तुला नाहीं हात ना पाय । टिळा स्वरूपी राहे । एका जनार्दनीं ध्याये । माझा टिळा ॥ ७ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.