हा कौल सावध ऐका । तत्त्वमसि धन्याचा शिक्का । सांडोनी अवघा धोका । शोकदुःखासहित ॥ १ ॥
दिनानाथ पतितपावन । ऐसें धन्याचें नामाभिधान । वेद ज्याचे बंदिजन । कीर्ति पावन लोकोत्तरीं ॥ २ ॥
याचा कौल अन्यथा नव्हे । सत्य जाणा मनोभावें । पतिप पापी अवघे यावे । सुखें नांदावें स्वानंदेसी ॥ ३ ॥
संचित क्रियमाण पुण्य पाप । इस्तकबिल तागाईत माप । शिल्लक बाकी त्रिविधताप । आपेंआप माफ केली ॥ ४ ॥
दिवे लावणी करा घरीं । शिक्का रोखा धरोनि शिरीं । माफ कैली वेठ बेगारी । घरोघरीं सुखें असा ॥ ५ ॥
कुल्ल बाब कुल्ल कानू । विडा टिका ओघ मानूं । तुमचे तुम्हां देऊं प्रमाणूं । शंका मनीं धरूं नका ॥ ६ ॥
संतीं मार मात केली । कलियुग देखुनि अवघी भ्याली । हे प्रतिज्ञा कळों आली । तेचि लिहिली कौलांत ॥ ७ ॥
रकमेप्रमाणें नव्हे शासन । तेथें कैचें भक्तिसाधन । सदरेसि खालावूनि मान । कीर्तन सुखें नृत्य करा ॥ ८ ॥
यमनियम विधिनिषेध । हा तुम्हांसी न लगे बाध । नाम कीर्तनीं अगाध । सुखें स्वानंद भोगावा ॥ ९ ॥
विवेकाचा नांगर धरा । टाकवेल तितका कुणबावा करा । लहान थोर बाहवो बरा । कौल मस्तकीं धरूनी ॥ १० ॥
आपली आपण सीमा पाहा । पेंडोळा देखोनि उगीच राहा । अदृष्टें पिकेल तितुकें लाहा । कटकट हकाट करूं नका ॥ ११ ॥
बीज नसेल पेराया । तरी सद्गुरूचे पाय धराया । लागेल तितुकें न्याया । जिवें जीया धन्याचेनी ॥ १२ ॥
चारी वर्ण चारी आश्रम । याच देहीं उत्तम मध्यम । ह्रदयीं धरूनियां प्रेम । नामस्मरण करा रे ॥ १३ ॥
साळी माळी तेली तांबोळी । बारा बलोतें तराळ कोळी । चांभार कुंभार सर्वकाळीं । नामावळी गर्जा रे ॥ १४ ॥
स्त्रिया शूद्र बाळमती । अवघे नाम धरूनियां चित्तीं । हा कौल दिला श्रीगुरुमूर्ति । यश कीर्ति संपादका ॥ १५ ॥
शिक्का धरूनियां शिरीं । यमासी ठेवा धाब्यावरी । तुम्हांवरी करतां गहजोरी । त्यास शासन होईल ॥ १६ ॥
एका जनार्दनीं नामधार । त्यांसीच आनंद निर्विकार । संतीं केला जयजयकार । कौल विचार जाणोनी ॥ १७ ॥