वृद्धपणीं शांती धरा तुम्ही सासुबाई । नरम गरम मागूं नका अंतीं सुख नाहीं ॥ १ ॥
रात्रंदिवस विचारितां जीव दिक् जाला । मायलेंकी राहा तुम्ही मज नेऊन घाला ॥ २ ॥
प्रपंचाचें ताक तुम्ही सांचविलें घरीं । संचिताचें दुग्ध लोणी गमाविलें चोरी ॥ ३ ॥
वासनेच्या बिडालीक कोंडुनी बाहेर ठेवा । नवहीं द्वारें गुप्त करा ज्ञानदीप लावा ॥ ४ ॥
प्राप्त भूमी चारी तुम्ही हात करा वेगीं । कल्पनेची रहाटी होड धन्य तोचि योगी ॥ ५ ॥
चारी मुक्ती त्याचे माथां काळ झेंप घाली । विश्वासानें जाऊं नका जीव मुक्ति झाली ॥ ६ ॥
अहेवमणी गळां तुम्ही व्यर्थ बांधियेला । बारा सोळा पुत्र जाले दादला नाहीं केला ॥ ७ ॥
वांझ तुम्ही पुत्र व्याले तुमचें तुम्हां साजे । इतर स्त्रिया करूं म्हणती मरती लोकलाजे ॥ ८ ॥
क्षणिक तुम्ही वृद्ध पहा क्षणिक तरुण बोले । एका जनार्दनीं शरण त्यानें रूप केलें ॥ ९ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.