जोहार मायबाप जोहार । मी दामाजीचा लेकवळा महार । माझें नांव विठु साचार । सारा झाडफेडीचा कारभार ।
मी करतों की जी मायबाप ॥ १ ॥
मंगळवेढें ठाणें जाण । दामाजीस ठेविलें कारभारी नेमून । गांवचा वसूल सारा करून । मज नफरा पाठविलें की० ॥ २ ॥
जोहार जी जोहार । मी लेकवळा विठु महार । दामाजी मजवर प्यार आहे की० ॥ ३ ॥
दुष्काळ पडला जाणोन । शिल्लक पेवें दामाजीनें विकुन । चिठ्ठी पैका घेउनी जाण । आलों की० ॥ ४ ॥
दामाजी परम स्नेहाळू। त्याचा मज कळवळू । चिठ्ठी घेउनी उतावेळू । आलों जवळ की० ॥ ५ ॥
आला वसूल खतावणी । जमा करा वसूल घेउनी । बाकी शून्य घालूनी । जाब द्यावा की० ॥ ६ ॥
वसूल सारा मेळवा । मज लेकवळ्या जाब द्यावा । पैं बाकी न ठेवा । दामाजीकडे की० ॥ ७ ॥
मी विठनाक महार । राहतों पंढरीं निरंतर । पाहावया आपुलें नगर । येथवर आलों की० ॥ ८ ॥
पैका पोचल्याची रसद । मज लिहून द्यावी त्वरित । मी जातों जी येथु कीं० ॥ ९ ॥
म्हणोनि केला जोहार । निघाला विठनाक महार । इकडे दामाजीचा विचार । ऐका की जी मायबाप ॥ १० ॥
प्यादे येउनी जाण । दामाजीस धरती येऊन । बेदरा नेती लगबगें करून । तों नवल जालें की० ॥ ११ ॥
स्नान करूनि जाण । दामाजी बैसला देवतार्चन । नित्य नेम वाचितां जाण । रसद आंत देखिली की० ॥ १२ ॥
रसद देखिली पाहतां ते वेळीं । बादशहाची मुद्रा देखिली । विठु महारासवें रसद पाठविली । बाकी शून्य जाली की० ॥ १३ ॥
एका जनार्दनीं केला जोहार । मोडिला अविद्येचा थार । व्यापूनियां चराचर । भजनीं सादर असावें की जी मायबाप ॥ १४ ॥