सकलयुक्त प्रवीण जिवाजीपंत शेखदार । तुम्हांवर बाकी निघाली म्हणोन तुम्हांस देहगांवास पाठविलें । तर देहेगांवीं राहून । विषय शेट व लोभाजी नाईक । यांचे बुद्धीस लागोनी भवसमुद्र तारावयाची भूल पडली । यामुळें कामाजी महाजन व मनीराम देशमुख तुम्हांस साह्य होऊन । तुमच्या निजस्वार्थाची खराबी केली । बुधाजी पाटील मोकदम । मुफसल्लाकीर्द होऊन म्हणों लागले कीं । कानडखिंड व तोंडापूर हे दोन्ही मातबर असतात । श्रवण खरीप व कीर्तन रबी पिकावयाची होती । ती ममताई आवानें हातीं लागूं दिली नाहीं । यासी उपाय केला पाहिजे । खावंदांपाशीं भागवतराव दिवाण । तो गीताबाईचा पुत्र राजयोगी । याची भेटावयाची तजबीज । वैराग्यस्वामी यांचे हातें व्हावी । प्रथम पश्चात्तापपंत । आपुले स्वाधीनच आहेत । त्यांजपाशीं येणें । ते तुझ्या वाणीचा हवाला घेतील । ते तुम्हांस मोकळे करतील । पुन्हा देहेगांवास व गर्भपुरास पाठविणार नाहींत । त्वां लिहिलें जे तूर्तच यमाजीपंतांची तलफ होणार । त्याची कांहीं तलफ माघारी फिरत नाहीं । त्याजबरोबर हुजूरच्या सनदा आहेत । म्हणून सांगितल्यावर हुकूम करणें । गैर न करणें । एका जनार्दनीं शरण । हा आशिर्वाद जाबचिठी ॥ १ ॥