एक ग्रामावरी जाऊन । एक नदीतीर पाहून । तेथें टिटवी करी शयन । दोन्ही पायांत खडा धरून गा ॥ १ ॥
टिटवी यमाची तराळीण । टिटाव टिटाव टिटाव । तीड तीड तीड जाणगा ॥ध्रु०॥
मरेल चौगुल्याची सून । पाटलाचे चौघेजण । कुळकर्ण्याची लाडकी सून । आतां गांवांत राहिलें कोण गा ॥ २ ॥
देशमुख देशपांडे चौधरी जाण । शेटे महाजन नेईन । चौगुल्याचे जवळ मरण । आतां गांवांत नाहीं कोण गा ॥ ३ ॥
नाईक वाड्यासी धरी । शेलकी देशमुखाची पोरी । याची गणना कोण करी । आतां गांवांत नाहीं थोरी गा ॥ ४ ॥
आतां गांवा वचनें हीन सारा । केवढा टिटवीचा दरारा । गांवांत हिंडतां चुकेल फेरा । महारामांगांचा तुला आसरा गा ॥ ५ ॥
लव्हार सुतार बलुते बारा । माळी तेली वाण्यास दरारा । सुनेकरासी दिधला थारा । म्हणोनि हरिभजन करा गा ॥ ६ ॥
आतां नाहीं कोणासी कोण । शेवट मारीन मी नेऊन । माझे संगतीं मांगीण । एका जनार्दनीं लहान थोरपण गा ॥ ७ ॥