जोहार मायबाप जोहार । महार मी कायापुरीचा । जन्मोजन्मीं वेसराख्या । आहे या गांवीचा ॥ध्रु०॥
कायापूर कसबे लांबी साडे तीन गांव । तीनशें साठ पेठा तेथें नांदतो उमराव ।
चौदा चौक दहा रस्ते बसविले अपूर्व । दिधली धन्यानें सनद जिवाजीपंताचे नांवें ॥ १ ॥
शिवाजीपंतानें जिवाजी ठेविला दिवाण । सहा षड्विकार मिळाले त्यासमान ।
तुम्ही सर्व ऐका तुम्हांसी सांगतों खूण । आपआपणा मधीं मिळुनी खाती भोंदून ॥ २ ॥
कामाजी कोतवाल यानें नागविलें बहुतांशीं । हरिहरांची अब्रू घेतो भय नाही त्यासी ।
जमदग्नी दुर्वास नाडिले महा महा ऋषी । क्रोधाजी फौजदार तोही मिळाला त्यांसी ॥ ३ ॥
लोभाजी चौधरी याला पैशाची हांव । अहंकार पाटील त्यांसी कांपतो सर्व गांव ।
दंभाजी नाईक सर्व करिती हावहाव । दया नाहीं रयतेवर केला उजाडचि गांव ॥ ४ ॥
जिवाजीपंतास हिशोबा द्या अवघा झाडा । नाहीं तर त्याचें पायीं घाला अनुहात खोडा ।
तरीच मायबाप हा गांव नांदेल बरा । एका जनार्दनीं पाय सद्गुरूचे धरा ॥ ५ ॥