धुम धुम बार उडविला । ऐसा गलीम कोण आला ।
त्यानें किल्ल्यासी वेढा दिला । तो आज ऐकिला ॥ १ ॥
राजा पुसे प्रधानाला । कां रे कशाचा आवाज आला ।
वेढा फौजेचा पडला । कसा वांचवीन जीवित्वाला ॥ २ ॥
फौजेचा आकार पाहिला । तोफा जडल्या रे किल्ल्याला ।
या रयतीत फितूर झाला । माझा संगती मिळाला त्याला ॥ ३ ॥
आतां कैसा राहिला किल्ला । या किल्ल्याचा आधार केला ।
मुजुमदारानेंच फितुर केला । आतां आश्रय कोण जाणिला ॥ ४ ॥
कोण वांचवील माझ्या प्राणाला । प्रधान विसंगीत होऊनि पडला ।
मातकर्याचा पहिला अबुला । विश्वासाचा हुजर्या मेला ॥ ५ ॥
कोण सांभाळील या किल्ल्याला । किल्ल्याचा पहिलाच पाया पडला ।
खबर नाहीं पायदळाला । तोफेचा म्होरेस्वार गेला ॥ ६ ॥
निदानीं आश्रा नाहीं किल्ल्याला । तोंडपुरचा दरवाजा पडला ।
धक्का लागला गांडियेसी । त्यानें मार्गच अवघा मोडिला ।
अंतकाळ आला राजाला ॥ ७ ॥
तोफा लावून चार्ही कोण । चार्ही बुरुज गेले पडून ।
धुगधुगीत राजाचें मन । मग कशास हो हैराण ॥ ८ ॥
यम चोपदार नेती बांधोन । सहस्त्र अंगा लावोन ।
तप्त अर्गळा मुखीं घालून । तप्त भूमीवर चालवून ॥ ९ ॥
सुळीं दिला राजा जाण । केलें कर्मे झाडा देऊन ।
गेलें तसेंच उसनें देणें । राज्याच्या अंतीं नर्क जाण ॥ १० ॥
ऐसे बोलविती प्रजाजन । शेवटीं राजा गेला निर्गुण ।
सावध म्हणे जनार्दन । धोका झाला ॥ ११ ॥