नळाखाली भिजलेले डोके नळासारखे होईल, नदीत बुडलेले डोके नदीप्रमाणे होईल. नदी पाप दूर करते. डोक्यातील घाण व हृदयातील घाण अंगावरील घाणीबरोबर बाहून जाते. नदी म्हणजे काय? नदी म्हणजे शेकडो ठिकाणच्या लहान-मोठ्या प्रवाहांचे परममंगल अद्वैत दर्शन होय! नदी म्हणजे अद्वैताची मूर्ती! नदी म्हणजे सुंदर, उदार, परमोच्च् सहकार्य! ते शेकडो प्रवाह परस्परांस तुच्छ समजत नाहीत. गटार येवो की दुसरा कोणता प्रवाह येवो, सारे एकत्र येतात. “आपल्यातील घाण खाली बसेल, आपल्यातील प्रसन्नता प्रकट होईल.” या अमर श्रद्धेने सारे प्रवाह एकमेकांत मिसळतात, एकमेकांशी सहकार्य केल्यामुळे त्यांचा महान प्रवाह होतो. हे प्रवाह परस्परांपासून अहंकाराने दूर राहते, तर त्यांचा विकास झाला नसता. त्यांना लांबी, रुंदी, खोली प्राप्त झाली नसती. ते अहंकारी प्रवाह आटून गेले असते, नाहीसे झाले असते, त्यांच्यात किडे पडले असते. परंतु ते एकमेकांतील अभिजात पावित्र्य पाहून एकत्र आले व महान नदी निर्माण झाली.
नदीत बुडविलेल्या डोक्यात हे विचार उत्पन्न झाले पाहिजेत. नदीचे हे अद्वैत-गायन बुद्धीला ऐकू आले पाहिजे. परंतु गंगेवर अंघोळ करणारे गंगापुत्र दगडाहून दगड राहतात! सर्व प्रवाहांना जवळ घेणा-या त्या नदीत उभे राहून ते दुस-याचा उपहास करीत असतात! “तू तुच्छ, तू तिकडे जा-” असा रुद्र म्हणत असत व नदीत डुंबत असता मानवाचा उपमर्द हे करीत असतात. शेकडो वर्षे नदीत डोकी बुडत आहेत, परंतु डोकी खोकीच राहिली आहेत!
नदीपेक्षा संगम अधिकच पवित्र! अद्वैताचा अनुभव घेणा-या दोन संतांची भेट म्हणजे केवढे पवित्र दर्शन! वसिष्ठ-वामदेवांची भेट, रामदास-तुकारामांची भेट, महात्माजी व रवीन्द्रनाथ यांची भेट, जवाहरलाल व मानवेंद्र रॉय यांची भेट- म्हणजे ते महान काव्य असते.
“सतां सद्भि: सङग: कथमपि हि पुण्येन भवति।।”
हजारो प्रवाहांनी पोटाशी घेत एक नदी येते, दुसरीकडून दुसरी एक तशीच नदी येते, व दोघी एकमेकींच्या गळ्यात पडतात!
गंगा, यमुना व सरस्वती यांच्या संगमाला आपण अत्यंत पवित्र मानिले आहे. एकाच शुभ्र-स्वच्छ उंच हिमालयापासून गंगा-यमुना निघाल्या! परंतु गंगा जरा गोरीगोमटी; ती अहंकाराने वरून वरून चालली. यमुना काळीसावळी; जरा दुरून दुरून चालली. परंतु काळ्या यमुनेला प्रेमाने मिठी मारल्याशिवाय गंगेला शतमुखांनी सागराला भेटता येणे शक्य नव्हते. ती अहंकारी गंगा नम्रपणे थबकली. तिकडून यमुना आली. गंगेने हात पुढे केले. “ये, यमुने ये. तू काळीसावळी म्हणून मी तुला तुच्छ मानिले. परंतु तुझ्या तीरावर गोपालकृष्णाने भक्तिप्रेमाचा पाऊस पाडला. राव-रंक एक केले. सर्वांना ‘सह नौ भुनक्तु’चा अनुभव दिला. ऐक्याची मुरली तुझ्या तीरावर वाजली. आकाशातील देव तुझ्या पाण्यात मासे झाले. तुझा महिमा थोर आहे. तू दिसायला काळीसावळी, परंतु आत-अंतरंगी अत्यंत निर्मळ आहेस. ये, मला भेट!” गंगेला गहिवरून आले. तिला बोलवेना.
यमुनाही उचंबळली. ती म्हणाली, “गंगाताई! तू माझी स्तुती करतेस, परंतु तुझा महिमाही अपार आहे. माझ्या तीरी भक्ती वाढली, परंतु तुझ्या तीरावर ज्ञान वाढले. योगिराजा भगवान पशुपती तुझ्या तीरावर ज्ञानात तल्लीन झाला. शेकडो ऋषी-महर्षी तुझ्या तीरावर तपश्चर्या करीत असतात. मोठेमोठे राजे राज्ये तृणासमान मानून तुझ्या तटाकी ब्रह्मचिंतन करितात. गंगाताई, तू म्हणजे मूर्त ज्ञान आहेस. मला तुझ्या शुभ्र पायांशी लोळण घेऊ दे!”