एक संताच्या गादीवरचे महाराज एका श्रीमंताकडे गेले. त्या श्रीमंताला नव्हते. मूलबाळ, ते गादीवरचे महाराज म्हणाले, ''पुन्हा लग्न करा. होईल आशीर्वादे मूल!'' त्या श्रीमंताने पुन्हा लग्नाची तयारी केली. परंतु त्या क्लीबाला का संतती झाली असती? गादीवरच्या महाराजांनी दुसरे काही प्रयोग केले असते, आशीर्वादाच्या जोडीला व्यभिचार जोडले असते, तर कदाचित झाले असते मूलबाळ. हे गादीवरचे महाराज विचार करीत नाहीत. पुन:पुन्हा लग्न करावयास सांगतात, आणि स्त्रियांची जीवने निराश व निरानंद करण्यात येतात. अशा स्त्रिया वेड्या हातात. भ्रमिष्ट होतात, किंवा काही घरच्या धष्टपुष्ट हिंदू वा मुसलमान नोकराजवळ विषय भोगतात. अशी काही निरानंद व भ्रमिष्ट स्त्रियांना भुताने पछाडले आहे असेही मग ठरविण्यात येते व भूत काढण्यासाठी त्यांना मारहाण होते! अरेरे! हा काय धर्म! काय ही संस्कृती !
लग्न लावणा-या आचार्याने आधी विचारले पाहिजे, ''या वधूवरांची नीट परीक्षा घेतली आहे का? तरच हा धार्मिक विवाह होईल. '' परंतु असे विचारणे म्हणजे आचार्याला अब्रह्मण्यम वाटते! इतर सा-या चौकशा करतात. हुंड्यांची चौकशी, शिक्षणाची चौकशी, सारे होते. परंतु वैद्यकीय चौकशी मात्र होत नाही.
वधूवरांचे गुणधर्म म्हणजे मानसिक परीक्षा व वधूवराचे आरोग्य म्हणजे शारीर परीक्षा. ह्या दोन परीक्षा झाल्या पाहिजेत. समान वर्णाचा विवाह हवा. आणि वर्ण म्हणजे आवड, रंग अस आपण मागे पाहिजे आहे. मुलीला कसली आवड आहे. कोणते काम तिला येते, तिच्या बुध्दीला, हृदयाला कोणता रंग आहे हे पाहिजे आहे. परंतु मुलीच्या अंगाचा वर्ण पाहण्यात येतो. तिच्या बुध्दीचा व हृदयाचा वर्ण, तिच्या अंतरात्म्याचा वर्ण यांच्याकडे कोणाचे लक्षही नाही! उलट, स्त्रियांना आत्माच नाही, म्हणजे एक प्रकारे त्यांना वर्णच नाही, असे समजण्यात येते! म्हणून आजचे सारे विवाह हे अशास्त्रीय व अधार्मिक विवाह आहेत. ज्या विवाहात स्त्री-पुरुषांच्या हृदय-बुध्दीचा वर्ण पाहण्यात येईल. त्यांच्या शरीराची अव्यंगता पाहण्यात येईल, तेच विवाह खरे शास्त्रीय विवाह होतील.
आज राक्षसगण आहे का देवगण आहे, हे पंचांगावरुन ठरवितात. ह्याचा वर्ण राक्षस आहे का देवाचा आहे, हे का पंचांगावरून ठरेल? समाज उपाशी मरत असता जो स्वत:ची कोठारे व स्वत:च्या पेढ्या भरुन ठेवता तो राक्षस. स्वत:साठी राखणारा तो राक्षस व दुस-यानां देतो तो देव. वर्ण हे कृतीवरून ओळखवयाचे. आत्म्याचे रंग प्रत्येक कृतीतून प्रगट होत असतात. ते पंचांगातून पाहावयाचे नसतात.
तसेच काही काही लहान जाती त्या जातीतच विवाह करीत असतात. त्या जातींत सर्वांचे रक्त एक होऊन गेलेले असते. सारे एकमेकांचे नातलग असतात. खानदेशात लाडसक्के जात आहे. त्या जातीत सारे परस्परांचे नातलग आहेत. परंतु त्या जातीच्या जरा बाहेर ते विवाह करणार नाहीत. आणि असे हे एका रक्ताचे अशास्त्रीय विवाह सनातनी ब्राह्मण प्रत्येक वर्षी लावीत आहेत! केवढा हा अधर्म! केवढी ही अशास्त्रीयता!
वर्ध्याच्या सत्याग्रहाश्रमाचे थोर आचार्य विनाबाजी एकदा म्हणाले, ''विवाह समुद्रातले नकोत आणि डबक्यातले पण नकोत. '' महान सूत्र त्यांनी सांगितले. एकदम एका भारतीयाने उठून अमेरिकेतील कोणाशी लग्न लावणे तेही सदोष होईल. व आपपल्या लहान जातीतच सारखी लग्ने लावणे तेही सदोष होईल. महाराष्ट्रातील गाईला एकदम युरोपियन वळू कदाचित मानवणार नाही. महाराष्ट्रातील गायीला पंजाबचा किंवा गुजरातचा वळू मानवेल. फार लांबचे नको, कारण वातावरण सारे अगदी भिन्न असते; आणि अगदी जवळचेही नको, कारण तेच वातावरण असते.