घेई ओढूनि संपूर्ण विषयांतून इंद्रियें ।
जसा कासम तो अंगें तेव्हां प्रज्ञा स्थिरावली ॥
कासव म्हणजे इंद्रियसंयमाचे प्रतीक. देवालयात घंटा वाजवावयाची, यामध्ये योगातील अनुहतध्वनीची कल्पना असावी असे वाटते. जिवाशिवाचे ऐक्य झाले, समाधी लागली. आनंदाचे गाणे सुरू झाले. मंगल वाद्ये जीवनमंदिरात सुरू झाली. अनुहतध्वनीची गर्जना सुरू झाली. योगमार्गात तो अनुहतध्वनी ऐकू येतो असे म्हणतात. अनुहत म्हणजे सारखा वाढणारा. सारखा अखंड असा एक नाद ऐकू येतो असे म्हणतात ! घंटावादनात अनुहतध्वनी गर्भित असेल, वा देवाचे दर्शन झाले म्हणून मंगल वाद्य वाजवावे असाही अर्थ असेल; घंटा वाजवून सांगावयाचे की, 'देवा, क्षणभर तरी तुझ्या दारात आलो होतो. क्षणभर तरी संसारातून मन बाहेर काढून, आपल्याच डबक्यातून बाहेर येऊन तुझे दर्शन घेतले बरे !' असाही भाव असेल.
भरलेल्या कलशाची फार महती आहे. लग्नाच्या वेळेस व-हाडणी हातांत भरलेला कलश घेऊन उभ्या असतात. जीवन म्हणजे एक मातीचा कलशच आहे. ज्याप्रमाणे रित्या घड्याला महत्त्व नाही. त्याप्रमाणे रित्या जीवनाला महत्त्व नाही. घडा भरलेला असला म्हणजे त्याला आपण डोक्यावर घेतो, त्याप्रमाणे तुमचा जीवनाचा कलश जर प्रेमाने भराल, सत्कृत्यांनी भराल, ज्ञानाने भराल, तरच लोक तुम्हांला डोक्यावर घेतील. रिकामी घागर अमंगल आहे. भरलेली घागर मंगल आहे. भारतीय संस्कृतीतील हे मंगल कलश सांगत आहेत, 'जीवन मांगल्याचे करा.'
देवाला निरांजन ओवाळणे म्हणजे काय ! खरोखर, हे जीवन पेटवून जीवाला ओवाळावयाचे आहे. जीवनाची मेणबत्ती सारखी पेटवत ठेवावयाची. 'देवा, ही जीवनाची मेणबत्ती समाजासाठी वितळली बरे !' असे देवाला निरांजन ओवाळून सांगावयाचे. पंचारती म्हणजे पंचप्राण. पंचप्राण ध्येयासाठी ओवाळून टाकावे लागतात.
उदबत्ती म्हणजे काय ? 'हे जीवन पेटवून मी सुगंध देईन', असे सांगणे. पेटल्याशिवाय सुगंध नाही. देवाला चंदन लावणे म्हणजे काय ? 'हा देह चंदनाप्रमाणे झिजवून त्याचा गंध तुला देईन', हाच त्यात अर्थ आहे. देवाला प्रदक्षिणा घालणे म्हणजे काय ? प्रदक्षिणेने देवाचे स्वरूप मनात ठसते. एक प्रदक्षिणा झाली की देवाला पाहावयाचे, प्रणाम करावयाचा, की पुन्हा दुसरी सुरू. प्रदक्षिणा तीन घाल, अकरा घाल, एकशे आठ घाल; जितक्या प्रदक्षिणा अधिक, तितकी मूर्ती अधिक ठसेल. प्रत्येकाने आपल्या ध्येयाभोवती प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. मजुरांची सेवा हे ध्येय ठरविणा-याने मजुरांच्या भोवती सारख्या प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. त्यांच्या चाळी पाहिल्या पाहिजेत. त्यांचे जीवन पाहिले पाहिजे. सारखे मजूर-देवाला प्रदक्षिणा घालाल तेव्हाच मजुरांचे खरे स्वरूप कळेल. त्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत की आनंद आहे, तोंडावर तेज आहे की प्रेतकळा आहे, त्यांना नैवेद्य मिळाला की नाही, त्यांच्या अंगावर वस्त्रे आहेत की नाहीत, ते तेव्हाच कळेल. राष्ट्रीय सभा खेड्यांतील कोट्यवधी शेतक-यांस देव मानीत असेल, तर राष्ट्रीय सभेच्या भक्तांनी या खेड्यांना प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत ! खेडे म्हणजे महादेवाचे मंदिर ! त्या खेड्यातील देवाचे कसे स्वरूप आहे, तो कसा राहतो, कसा वागतो, काय खातो, काय पितो, काय वाचतो, ज्ञान आहे की नाही, घरात दिवा आहे की नाही, या देवाचे बैल रस्त्यातील गा-यात फसतात की काय, उन्हाळ्यात पाण्याविना हा देह तडफडतो की काय, हे सारे पाहिले पाहिजे. ज्ञानाचे ध्येय असेल, तर थोर विद्वानांच्याभोवती फिरा. त्यांची सेवा करा. पृथ्वी व चंद्र सूर्याभोवती फिरून प्रकाश मिळवितात. तुम्ही निरहंकारपणे ज्ञानसूर्याभोवती फिरा. कलोपासक असाल तर त्या त्या कलावंतांभोवती फिरा.
प्रदक्षिणा घालता घालता त्या ध्येयदेवाची जन्मोजन्मी पूजा करावी असे वाटेल. 'सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती' असे वाटेल. साष्टांग लोटांगण घालू. हा देह दंडवत ध्येयदेवाच्या सेवेत पडेल असे आपण निश्चिंत करू. म्हणून प्रदक्षिणेनंतर नमस्कार व शेवटचे मंत्रपुष्प, शेवटचे महासमर्पण. जीवनपुष्पाचे ते चिरसमर्पण !
उपनिषदांत भगवान सूर्यनारायण हे प्रतीक सांगितले आहे. हा सूर्य म्हणजे नारायण. सूर्य त्या चैतन्यमय प्रभूचे स्वरूप. सूर्य चराचराला चालना देतो. सूर्य उगवताच फुले फुलतात, पक्षी गातात, उडतात, गायीगुरे हिंडूफिरू लागतात, मानवांचे व्यवहार सुरू होतात. त्या विश्वंभराच्या विश्वचालनेची कल्पना या सूर्यावरून येईल. सूर्याची उपासना म्हणजेच या विश्वेश्वराची उपासना!
मूर्तिपूजा म्हणजे प्रतीक आहे. रामाची मूर्ती पाहताच रामाचे चरित्र डोळ्यांसमोर उभे राहते. एका क्षणात सारे रामायण जणू आठवते. एका क्षणांत सारे पावित्र्य येऊन सामावते.
परंतु पाषाणमयी मूर्ती पाहावयास जरा दूर जावे लागते. पाषाणमयी मूर्ती घडविण्यासही प्रयास. मूर्ती, पुतळे, चित्रे, ही सारी थोरामोठ्यांची किंवा प्रिय व्यक्तींची आपण प्रतीके करतो, ती तितकी सहजसाध्य नाहीत.