भारतीय संस्कृतीतील षोडश संस्कारांत अशी अनेक प्रतीके आहेत. मरणानंतर जेव्हा शव नेण्यात येते, तेव्हा मडके पुढे धरावयाचे. म्हणजे हा मृण्मय देह होता, तो फुटला. त्यात रडण्यासारखे किंवा अनैसर्गिक असे काही नाही, हे सूचित केले आहे. त्या शवाला स्नान घालतात. नवीन वस्त्र देतात. कारण ते नवीन घरी जावयाचे. शुध्द, स्वच्छ होऊन देवाकडे जाऊ दे. कोरे करकरीत वस्त्र नेसून जाऊ दे. मरताना घोंगडीवर घेतात. त्यात अनासक्त होऊन, संचयवृत्ती सोडून देवाघरी जा, हा देह सोड, असे ध्वनित केले आहे. मरताना प्राण जाताच तुळशीपत्र तोंडावर ठेवतात. त्याचा अर्थ देहावर तुळशीपत्र ठेविले. हा देह आता देवाचा. जिवंतपणीही तुळशीच्या माळा वगैरे गळ्यात घालतात. त्यातील अर्थ हाच असतो, की देह देवाचा. देहावर तुळशीपत्र ठेविले.
कानांत रुद्राक्ष घालतात. म्हणजे काम शुभ ऐकोत; शिव, कल्याणकर असेच ऐकोत, हा भाव. कारण रुद्राक्ष शंकराला प्रिय. शंकर म्हणजे कल्याण करणारा. शंकराला ते आवडते-जे सदा शिव असते; हितकर, मंगल असे असते. गळ्यातही रुद्राक्ष घालतात. बोटात पवित्रक घालतात. बोटे पवित्र कर्मे करतील हाच भाव.
वारकरी भगवा झेंडा नेहमी जवळ बाळगतो. जेथे जाईल तेथे देवाचा सैनिक, खुदा-इ-खिदमतगार, असा त्यात भाव आहे. भगवाच रंग का ? भगवा रंग त्याग सुचवितो. संन्याशाचीही वस्त्रे भगवी. संन्यास म्हणजे संपूर्ण त्याग; महान यज्ञ. भगवा रंग ज्वाळांचा आहे. ज्वाळा लालसर दिसतात, अगदी लाल नसतात; म्हणून हा भगवा रंग.
शंकराचार्यासमोर नेहमी मशाल असते. याचा अर्थ सदैव प्रकाशाचीच पूजा करण्यात येईल असा असावा. धर्माचे ज्ञान देणारा आचार्य अंधारात राहून कसे चालेल ? सदैव ज्ञानयज्ञ पेटता हवा, ज्ञानसूर्य तळपत असावा.
आपण मोठी यात्रा वगैरे करून आलो, म्हणजे काही तरी सोडतो. भगिनी निवेदितादेवींनी यातील रहस्य एके ठिकाणी सांगितले आहे. त्या यात्रेचे स्मरण राहावे, म्हणून आपण प्रिय वस्तूचा त्याग करतो. यात्रा म्हणजे पवित्र वस्तूंचे दर्शन, पवित्र स्थलांचे दर्शन; यात्रा म्हणजे जीवनाला पावित्र्य देणारा अनुभव. हा अनुभव आपल्या जीवनात अमर झाला पाहिजे. नाही तर तात्पुरते गंगेचे दर्शन प्रसन्न, पावन वाटते. पुन्हा घरी आल्यावर त्याचे काही स्मारक नाही. तर तसे होऊ नये, म्हणून आपण काही त्यागसंकल्प करतो. कोणी म्हणतो; मी रामफळ सोडीन, कांदा सोडीन. कोणी म्हणतो, डाळिंब सोडीन. असे काही तरी सोडण्याचे निश्चित केल्यामुळे ज्या ज्या वेळेस रामफळ पाहू, ज्या ज्या वेळेस कांदा वा डाळिंब पाहू, त्या त्या वेळेस काशीयात्रा पुन्हा आठवेल. पुन्हा गंगेचे स्मरण, महादेवाचे स्मरण, गंगातीरावरील प्राचीन ब्रह्मर्षी, राजर्षी यांच्या तपश्चर्येचे स्मरण; शंकराचार्यांच्या अद्वैताचे स्मरण. आपण पुन्हा त्या यात्रेत जणू जातो. एका क्षणात तो सारा अनुभव पुन्हा जागृत होतो व जीवनात अधिक खोल जातो. तो अनुभव आपल्या रक्तात मिसळतो, अधिक आपणास होतो.
आपण जीवनातील महान अनुभवांच्या संपत्तीची काळजी घेत नाही म्हणून आपण अंतर्दरिद्री असतो भिकारी हृदये व भिकारी मने !
"भिकारी जरी इतुकी केली मी वणवण
रिकामी झोळी माझी जवळ नाही कण'
आपली जीवनाची झोळी नेहमी रिकामी. कारण सारे अमोल अनुभव गळून जातात. महात्माजींचे दर्शन झाले, ते दर्शन आपल्या जीवनात साठवले गेले पाहिजे. विलायती वस्त्र सोडल्याने, ग्रामोद्योगी ज्या वस्तू नाहीत त्यांचा त्याग केल्याने, ते दर्शन अमर होईल.