परंतु हा यज्ञ सनातनींस समजेनासा झाला आहे. लाखो गरिबांची हायहाय त्यांना दिसत नाही. त्यांची बुध्दी मेली आहे, हृदय सडले आहे. केवळ कार्पण्य त्यांच्याजवळ उरले आहे. दुस-यांची उपासमार पाहून त्यांचे पोट दुखत नाही. सज्जनगडावरची एक गोष्ट जुने लोक सांगतात. दासनवमीचा सज्जनगडावर नऊ दिवस उत्सव असतो. नऊ दिवस गडावर येणा-या सर्वांना जेवण मिळते. समर्थांच्या गादीवर जे महाराज असतील त्यांनी गडावर कोणी उपाशी नाही ना, अशी सर्वत्र चौकशी करुन मग रात्री जेवावयाचे. एकदा काय झाले, असा उत्सव चालला होता. परंतु एक दिवशी मध्यरात्री महाराजांचे पोट दुखू लागले. काही केल्या राहीना. शेवटी महाराज म्हणाले. ''गडावर कोणी उपाशी तर नाही ना राहिला? जा, पाहून या. '' मंडळी मशाली पाजळून धावली. चौकशी सुरू झाली. एका झाडाखाली एक माणूस; आंधळा का पांगळा; भुकेने तडफडत होता. मंडळींनी त्याला उचलून नेले. महाराजांनी त्याला गोड बोलून पोटभर जेवू घातले. महाराजांचे पोट दुखावयाचे थांबले. गरिबांचे पेटलेले पोट शांत होताच महाराजांचे पोट शांत झाले!
अशी ही धर्ममय पोटदुखी किती संस्कृतिसंरक्षकांना आहे? धर्माच्या गावाने कंठशोष करणा-यांत आहे? दुस-यांची पेटलेली पोटे, ती यज्ञकुंडे, ते पवित्र जठाराग्नी शांत होत नाहीत म्हणून किती जणांना अशान्ती वाटते, किती जणांचे डोळे दु:खाने ओले होतात? संतापाने पेटतात? ज्याचे पोट दुखेल तो खरा समर्थांचा भक्त, ज्याचे असे पोट दुखेल तो भारतीय संस्कृतीचा खरा उपासक, तो संतांच्या सेवक, ऋषींचा पूजक, म्हणून महात्माजी, जवाहरलाल यांसारखे तळमळणारे आत्मे हे खरोखरच संस्कृतिसरंक्षक आहेत, संताचे व ऋषींचे सत्पुत्र म्हणून शोभतात. खरे अग्निहोत्र त्यांनी चालविले आहे व महान प्रखर दीक्षा शेकडो तरुणांस ते देत आहेत.
धर्ममय अर्थशास्त्र अशा दृष्टीने आहे. धर्म-अर्थ-काम-मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थातील 'अर्थ' अशा थोर धर्माच्या पायावर उभारला गेला पाहिजे. सर्र्र्व समाजांतील शक्तीचे नीट धारण होईल, नीट पोषण होईल, अशा स्वरूपाचे हे अर्थशास्त्र पाहिजे. सर्व मानवजातीचे हित पाहणारे असे मग हे अर्थशास्त्र होईल. या अर्थशास्त्राला अजून आरंभही झाला नाही. म्हणून जगात मोक्ष किंवा स्वातंत्र्य अद्याप कोठेच नाही. मोक्षाचा जन्म अद्याप व्हावयाचा आहे. आपण सारे गुलाम आहोत. हिंदुस्थानच इंग्लंडचे गुलाम आहे असे नाही, तर इंग्लंडही हिंदुस्थानचे गुलाम आहे. हिंदुस्थान माल घेईल तरच इंग्लंड जगणार! चार नोकर श्रीमंत धन्याला कुबड्या देऊन चालवितात, त्यातलाच हा प्रकार आहे. ते नोकर त्या श्रीमंताचे गुलाम व तो श्रीमंत त्या नोकरांचा गुलाम! ते नोकर जर आधार देणार नाहीत. तर तो लुळापांगळा श्रीमंत धुळीस मिळेल. हिंदुस्थान इंगलडचा आधार काढून घेईल तर इंगलंड मरेल. दुस-यास गुलाम करणारा स्वत:ही नकळत गुलाम होत असतो. जे पेरावे ते मिळत असते. एक श्रीमंत गुलाम, एक दरिद्री गुलाम! एक ढेरपोट्या गुलाम व एक पोटाची दामटी वळलेला गुलाम! एक गाल वर आलेला गुलछबू गुलाम, एक बसक्या गालांचा निस्तेज गुलाम! परंतु शेवटी दोघेही गुलामच!
जगात जोपर्यत धर्ममय अर्थशास्त्र येत नाही, सर्वोदय करणारे, मानवास साजेसे अर्थशास्त्र येत नाही, तोपर्यत जगात खरे स्वातंत्र्य नाही. आज स्वातंत्र्याची सोंगे आहेत. स्वातंत्र्याच्या पडछाया आहेत. स्वातंत्र्याची पिशाचे आहेत. खरे मंगलदायक व आनंददायक, सर्वांचा सर्वांगीण विकास निरपवाद करू पाहणारे स्वातंत्र्य अद्याप बहुत दूर आहे. पृथ्वीला या मंगलमय बालकाच्या प्रसववेदना थोड्या थोड्या होऊ लागल्या आहेत. परंत पृथ्वीच्या पोटात एका कोप-यात या कळा सुरू झाल्या आहेत. परंतु प्रसववेदना पूर्ण होऊन दिव्य स्वातंत्र्य-बालक जन्माला यावयास किती युगे लागतील, ते कोणी सांगू शकेल?