संन्यास म्हणजे निर्वाण. स्वत:ला पूर्णपणे मालविणे. माझे कुटुंब, माझा समाज, माझी जात, माझा देश असे तेथे महत्त्व नाही, माझा मान, मला खायला, मला पैसा, असला तेथे प्रकार नाही. संन्यास म्हणजे समदृष्टी सूर्याचे किरण सर्वांसाठी तसा संन्यास सर्वांसाठी, माझ्याकडे कोणीही येवो, त्यांच्यासाठी मी आहे.

म्हणूनच संन्याशाने एक ठिकाणी राहू नये असे सांगितले आहे. तो वा-याप्रमाणे जीवन देत विचरत राहील. सूर्याप्रमाणे पावित्र्य व प्रकाश देत फिरत राहील.

अशा रीतीने या चार आश्रमांतून शेवटी केवळ निरहंकार व्हावयाचे, विकार व्हावयाचे. माझ्या आत्म्याने वाढत वाढत सर्वांना प्रेमाने मिठी मारावयाची!

आज आपल्या समाजात ब्रह्मचर्याचा लोप झाला आहे. वानप्रस्थ व संन्यास ही नावे उरली आहेत. एक गृहस्थाश्रम उरला आहे. पण तोही रडका व निस्तेज आज वर्णाश्रमधर्म थोडाबहुत कोठे आहे का, असे जेव्हा मी पाहू लागतो. तेव्हा तो जवळजवळ कोठेच दिसत नाही. वर्णधर्म तर स्वराज्य येईल तेव्हाच त्याचा प्रयोग सुरू होणे शक्य आहे. आणि आश्रमधर्म आहेत ते प्रत्येकाच्या विवेकातून जन्माला यावयाचे आहेत. ते लादावयाचे थोडेच आहेत? वर्ण एक वेळ लादता येईल. ''तुला हे काम चांगले करता येईल. हेच कर. '' असे सांगता येईल. परंतु वानप्रस्थ व संन्यास म्हणजे का लाल कपड्यांचे वस्त्रदान? दु:खी जीवांना आनंदमूर्ती नाव देणे म्हणजे का संन्यास? संन्यास म्हणजे धंदा नव्हे, संन्यासाची आतून प्रेरणा हवी. स्वत:च्या विकासाची इच्छा हवी. उत्तरोत्तर मी वाढत गेले पाहिजे अशी तहान हवी.

समाजाला आज सर्वत्र वानप्रस्थ व संन्यास यांची जरुरी आहे. शेकडो प्रसारक पाहिजे आहेत. शेकडो संघटना करणारे पाहिजेत. औद्योगिक, आरोग्य; विषयक धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व प्रकाराचे ज्ञान देणारे हजारो व्रती लोक पाहिजे आहेत. परंतु एकही मिळत नाही. समाज हे मोठे कुटुंब मानून त्या समाजात कामे करण्यासाठी लोक पाहिजे आहेत. वर्णाश्रमधर्माच्या पाटया लावून सारे बसत आहेत! परंतु नेभळट गृहस्थाश्रमापलीकडे पाऊल तर टाकावयास कोणी तयार नाही!

आज महात्माजी वर्णाश्रमधर्म सांभाळीत आहेत. ते अनेकांना वर्ण देत आहेत. ''ये, तुला काम देतो. गोरक्षण आवडते, ये;  खादी आवडते, ये; सफाईचे काम करावयाचे आहे, ये;  मधुसंवर्धनविद्या शिकावयाची आहे, ये;  खेडयात शाळा शिकवशील, ये;  कागदाचा धंदा करशील, ये;  तेलाचा घाणा चालविशील, ये. '' निरनिराळे धंदे निर्माण करून हा महापुरुष निरनिराळ्या वृत्तींच्या माणसांस कामाला लावीत आहे. म्हणजेच वर्णधर्म निर्माण करीत आहे.

राष्ट्रातील कोट्यावधी बेकार माणसांना त्यांच्या त्यांच्या गुणधर्मानुसार काम देण्याची व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यत वर्णाश्रम हा शब्द म्हणजे थट्टा आहे. आणि जो थोर पुरुष अशी कामे शोधून काढतो आहे, त्यासाठी सतत आशावादी राहून हिमालयासारख्या कष्टराशी उचलीत आहे, त्यालाच धर्मनाश करणारा असे काहींना संबोधावे, हे त्या वर्णधर्माचे दुर्दैव आहे!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel