किती झाले तरी या मृण्मय शरिरात आपण कोंडलेले आहोत. या मातीच्या मडक्यात संपूर्ण ज्ञान मावणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या मडक्यातील पाण्याचे थंडीने जर स्वच्छ शुभ्र बर्फ झाले तर ते मडके फुटते. त्याप्रमाणे स्वच्छ व शुद्ध ज्ञान या देहात न मावल्यामुळे देहाचे मडके फुटते. ही देहाची खोळ गळल्याशिवाय परिरपूर्णतेची भेट नाही.

“पडलें नारायणी मोटळें हें”

हे देहाचे मोटाळे पडल्यावरच आत्मा परमात्माशी मिळून जातो.

परंतु संपूर्णपणे अहिंसा शक्य नाही म्हणून ती मुळीच आचरू नये असे नाही. शक्य तितके आपण पुढे पुढे जावे. शेतीतील शेकडो, लाखो किड्यांची हिंसा आपणांस टाळता येणार नाही. हजारो जीवजंतू न कळत आपल्या पायाखाली चुरडले जात असतील, परंतु असे हे चालणारच. जे अपरिहार्य आहे ते होईल. आपले काम इतकेच की मुद्दाम हिंसा करू नये. जीवनात अधिकाअधिक अहिंसा आणण्याची खटपट करावी. चालताना काळजीपूर्वक चालावे, बोलताना काळजीपूर्वक बोलावे, कोणाचे मन दुखवू नये, कोणाचे अकल्याण चिंतू नये, कोणाचा तळतळाट घेऊ नये, घरोबा असावा. प्रेम जोडावे, सहकार्य वाढवावे. पशु-पक्षी, कीड-मुंगी यांची उगीच हिंसा करू नये. अशा रितीने रोजच्या जीवनातच आपण अहिंसा अधिकाअधिक आणू या. दररोज काही लढाई नाही. प्रत्येक क्षणी पायासमोर काही साप-विंचू नाहीत. अंगावर वृक-व्याघ्र हरघडीला येत नाहीत. ते अपवादात्मक प्रसंग आहेत. अपवादात्मक प्रसंगी दुबळेपणाने, लाजेने करा हिंसेचा वाटले तर अवलंब. परंतु इतर दैनंदिन व्यवहारात, समाजात हरघडी वागताना आपण उत्तरोत्तर अधिक प्रेमळ, अधिक सहानुभूती दाखविणारे, अधिक सहकार्याला उत्सुक असे होऊ या. हे जीवन सुखमय व निर्भय असे करू या.

भारतात प्राचीन काळी आश्रम असत. जेथे अहिंसेचा अधिकांत अधिक प्रयोग दाखविता येईल अशी ती स्थाने असत. शहरात बाग असते. त्या बागेत गेल्यावर प्रसन्न वाटते. त्याप्रमाणे आजूबाजूच्या हिंसक संसारात अहिंसेला पूजणारे व भजणारे असे पावन व प्रसन्न आश्रम त्या काळात असत. सामान्य जनता मधूनमधून तेथे जाई व प्रेम शिकून येई.

दुष्यंत इतर ठिकाणी हिंसा करीत होता; परंतु आश्रमाजवळ येऊनही जेव्हा तो हिंसा करू लागला, तेव्हा आश्रमातील मुनी म्हणाले :

"न खलु न खलु बाण: सन्निपात्योयमस्मिन् ।
मृदुनि मृगशरीरे पुष्पराशाविवाग्नि: ॥'


"राजा ! या कोमल हरणावर नको रे नको बाण मारू.' एकीकडे आकर्ण धनुष्य ओढणारा राजा दुष्यंत व एकीकडे त्या हरणांना अभय देणारे ते तपोधन ! एकीकडे हिंसेत रमणारा राजस राजा व दुसरीकडे प्रेमाची पूजा करणारा सात्त्विक ऋषी ! राजाचे धनुष्य नमले. त्याचे हृदय विरघळले. आश्रमाने त्याच्यावर अहिंसेचा संस्कार केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel