एकत्र कुटुंबपद्धतीत जो मुख्य असतो त्याच्यावर फारच जबाबदारी असते. त्याला सर्वांची मने सांभाळावी लागतात. यासाठी त्याला अपरंपार त्याग करावा लागतो. तो मुख्य मनुष्य स्वतःच्या मुलांबाळांस आधी दागिने करणार नाही, स्वतःच्या पत्नीस आधी इरकली लुगडी घेणार नाही. आपल्या लहान भावांची मुलेबाळे, आपल्या पाठच्या भावांच्या बायका, त्यांची काळजी तो आधी घेईल. त्यांना आधी वस्त्रे, अलंकार तो घेईल. असे तो करील तरच त्याच्या शब्दाला मान राहील. तरच त्याच्याबद्दल आदर व आपलेपणा कुटुंबातील सर्वांस वाटेल. त्यागाने वैभव मिळत असते ते असे.

संध्येच्या वेळी आपण एक मंत्र म्हणतो, त्यात पुढील चरण आहे-

“सर्वेषामविरोधेन ब्रह्मकर्म समारंभे”

“आता कोणाचाही विरोध नाही. आता मला माझे ब्रह्मकर्म आरंभू दे.” सर्वांचा अविरोध. फार महत्त्वाचे आहेत हे शब्द. आधी कोठले ब्रह्मकर्म ? आधी कोठली स्नानसंध्या ? कोठले देवदेवतार्चन ? कोठले जप-तप ? समाजात आधी सलोखा निर्माण करा. स्नेह निर्माण करा. मानवजातीतील विरोध दूर करा, कलह मिटवा, द्वेष-मत्सर नाहीसे करा व मग तुमची ब्रह्मकर्मे आरंभा.”

हा अविरोध कसा निर्माण होईल ? संयमाने प्रत्येकजण आपल्या वासना इच्छा यांना जर थोडासा लगाम घालील, तर अविरोध निर्माण होणे सुकर होईल. पेटीतील प्रत्येक सुर वाटेल तसा ओरडू लागला, तर संगीत कसे निर्माण होईल ? त्या सुरांनी स्वतःच्या इच्छांना संयत केले पाहिजे. त्याप्रमाणे जीवनातून संगीत निर्माण व्हावे असे जर मानवजातीस प्रांजलपणे वाटत असेल, तर मानवजातीचे स्वतःच्या सुरांवर संयम घातला पाहिजे. इटली आपला सूर फारच उंच काढील, जर्मनी तिकडून बोंबलत उठेल, जपान आदळआपट करीत भांडत बसेल, तर संगीत कसे निर्माण व्हावयाचे ?

भारतीय जीवनात आज संगीत नाही. प्रांताप्रांतांत भांडणे आहेत. मतभेद असू शकतात, परंतु मतभेदांतून मत्सराची भुते उठतात तेव्हा भय वाटते. भारताचा राष्ट्रव्यापक एकत्र कुटुंबपद्धतीचा प्रयोग आहे. भारत हे एक राष्ट्र आहे. पूर्वजांनी भारताचे तुकडे कधी कल्पिले नाहीत. आपल्या डोळ्यांसमोर भारतीय ऐक्याची भव्य कल्पना त्यांनी सदैव ठेविली होती. आपण स्नान करताना केवळ महाराष्ट्रातील नद्यांचे स्मरण नाही करणार, तर सर्व भरतखंडातील नद्यांचे स्मरण करतो. “हरगंगे, यमुने, नर्मदे, तापी, कृष्णे, गोदावरी,  कावेरी-” असे आपण म्हणतो. कलशाची पूजा करताना त्या लहान कलशात सारा हिंदुस्थान आपण पाहात असतो.

गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति।
नर्मदे सिंधु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु।।


अशा प्रमुख नद्यांचे स्मरण आपण करतो. “अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवन्तिका। पुरी द्वारावत चैव” अशा या पवित्र सप्तपुरी आपण भारताच्या चारी दिशांत ठेविल्या आहेत.

दुर्लभं भारते जन्म।

असे ऋषीने मोठ्या गौरवाने म्हटले आहे. पूर्वासांच्या डोळ्यांसमोर अंग, वंग, कलिंग नसे ; गुर्जर, विदर्भ, महाराष्ट्र नसे ; त्यांच्या डोळ्यांसमोर ‘भारत’ असे !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel