मूर्तिपूजा
भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजा ही एक फार थोर व मधुर अशी कल्पना आहे. मानवाला उत्तरोत्तर स्वत:चा विकास करून घेता यावा म्हणून जी अनेक साधने भारतीय संस्कृतीने निर्माण केली आहेत, त्यांतील हे एक महान साधन आहे. मूर्तिपूजेचा जितका जितका विचार करावा, तितका तितका तिच्यातील भाव खोल असा वाटू लागतो.
मनुष्यप्राणी हा विभूतिपूजक आहे. आपणांमध्ये ही प्रवृत्ती स्वयंभूच आहे. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचे कौतुक आपण करतो. आपल्याहून जे थोर आहेत-बुध्दीने, हृदयाने महान आहेत-त्यांची पूजा करावी असे वाटते. ही महान विभूतीची पूजा करण्याची वृत्ती जर आपणांत नसती, तर आपला विकास होता ना.विभूतिपूजा हे विकासाचे प्रभावी साधन आहे.
मूर्ती म्हणजे आकार. मूर्तिपूजा म्हणजे आकारपूजा, प्रत्यक्ष पूजा. आपल्या डोळयांसमोर काही तरी प्रत्यक्ष आपणास लागत असते. आपण जीवनाच्या प्रथमावस्थेत सारे आकारपूजक असतो. आपण व्यक्तीभोवती जमतो. व्यक्तीशिवाय आपले चालत नाही. जिचे डोळयांनी दर्शन घेऊ, जिचे शब्द कानांनी ऐकू, जिचे पाय हातांनी धरू, अशी मूर्ती आपणांस पाहिजे असते. म्हणूनच बौध्दधर्मात तीन साधकावस्था सांगितल्या आहेत :
बुध्दं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
या तीन स्थितींतून मनुष्याला जावे लागते. मनुष्य प्रथम लहान व्यक्तीला शरण जातो. कोणी महात्माजींच्याभोवती जमतील, कोणी अरविंदांच्या चरणांजवळ जातील. कोणी रवीन्द्रनाथांच्या विश्वभारतीत शिरतील. अशा रीतीने मनुष्य विकासाकडे जाऊ बघतो.
परंतु व्यक्ती ही क्षणभंगुर आहे. आज ना उद्या व्यक्तीला पडद्याआड जावयाचे आहे. ज्या महापुरुषाच्या शरीरावर आपण प्रेम केले, ते शरीर एक दिवस गळून पडते. ते प्रेमळ डोळे मिटतात. ते सुधा स्त्रवणारे मुख बंद पडते. ते आशीर्वाद देणारे हात थंडगार पडतात.
ज्या विभूतीच्या चरणांशी आपण बसलो, ती विभूती अदृश्य होते. परंतु त्या विभूतीचा बाह्य आकार हा महत्त्वाचा नाही. त्या आकारातून जे दिव्य बाहेर पडत होते ते महत्त्वाचे होते. ते तत्त्व काय होते ? ते तत्त्व कसे होते ?
त्या महापुरुषाभोवती जमलेले सारे एकत्र बसतात. त्यांचा भ्रातुसंघ होतो. एका गुरुचे ते शिष्य. गुरूच्या उपदेशाचे ते अनुकरण करू पाहतात. परंतु गुरूच्या उपदेशाबद्दल त्यांच्यात मतभेद होतात. तो भ्रातुसंघ टिकत नाही. त्याच्या शाखा होतात. निरनिराळे पंथ होतात. अशा वेळेस काय करावयाचे ?
व्यक्ती गेली. संघ गेला. आता काय राहिले ? धर्म राहिला. माझा गुरू ज्यासाठी जगला व मेला असे वाटते. त्या धर्माला मी शरण जातो. त्या महाविभूतीचे जे जे तत्त्वज्ञान मला वाटते, त्या तत्त्वज्ञानाची मी पूजा करू लागतो. माझ्या दृष्टीने त्या महापुरुषाचे जे स्वरूप मला वाटते, त्या स्वरूपाची मी उपासना करू लागतो.
व्यक्तिपूजेपासून आपण आरंभ करतो व तत्त्वपूजेत त्या आरंभाचे पर्यवसान होते. मूर्तापासून निघून अमूर्ताकडे जात असतो. मूर्तिपूजेची ही मर्यादा आपण ओळखली पाहिजे. शेवटी कधी तरी व्यक्तातून अव्यक्ताकडे, मूर्तातून अमूर्ताकडे, आकारातून आन्तरिक तत्त्वाकडे आपणांस गेल्यावाचून गत्यंतर नाही.