अवतार-कल्पना

अपौरुषेयवाद व अवतारवाद या दोन गोष्टींनी भारतीयांचा अध:पात झाला असे समजण्यात येते. अपौरुषेयवाद आता कोणी मानीत नाही. वेद माणसांनी न लिहिता ते आकाशातून पडले असे आज विसाव्या शतकात तरी कोणी मानणार नाही. वेदांमध्ये अनेक स्तोत्रे 'हे मी आज नवीन स्तोत्र रचीत आहे' असे उद्गार काढताना आढतात. वेद यांचा अर्थ विचार, ज्ञान, अनुभवसंपदा एवढाच आता घ्यावयाचा. वेदांवर उभारलेला धर्म म्हणजे ज्ञानावर, अनुभवांवर उभारलेला धर्म. जसजसे ज्ञान वाढत जाईल, अनुभव नवीन येत जाईल, तसतसे सनातन धर्मांचे स्वरूपही नवनवीन होत जाईल. सनातन धर्म म्हणजे वाढता धर्म.

परंतु अवतारवादाने नुकसान का व्हावे, हे समजत नाही. या अवतारवादातील मूलभूत कल्पना त्रिकालाबाधित आहे. अवतारवाद म्हणजे दुर्बलतावाद नव्हे. अवतारवाद म्हणजे प्रयत्नांचा अभाव नव्हे. अवतारवाद म्हणजे अपरंपार प्रयत्नवाद. अवतारवाद म्हणजे अविरत कर्म, अखंड उद्योग.

आपण स्वस्थ बसून अवतार होत नसतो. घुसळल्याशिवाय नवनीत हातात येत नाही. धडपडीशिवाय फळ नाही. कष्टाशिवाय कार्य नाही. त्याप्रमाणे प्रयत्नाशिवाय अवतार नाही. प्रयत्नांच्या पराकाष्ठेला अवतार हे फळ लागत असते.

आपल्या मनातील आशा-आकांशा ज्याच्या ठायी अवतरलेल्या आपणांस दिसतात, तो अवतार होय. आपल्या मनातील ध्येये, आपल्या भावना, आपली सुखदु:खे, आपली मनोगते ज्याच्या ठायी मूर्तिमंत दिसतात तो अवतार होय.

अवतार आधी नाही. आधी आपण आणि नंतर अवतार. आपण सारे धडपड करीत असतो. लहान-मोठे प्रयत्न करीत असतो. जो तो आपापल्या परीने समाजात सुखस्वास्थ्य निर्माण करण्यासाठी प्राणपर कष्ट करीत असतो. परंतु आपल्या सर्वांच्या प्रयत्नांत एकसूत्रता नसते, एकवाक्यता नसते. आपण कोठे तरी धावत असतो, कोठे तरी घाव घालीत असतो. आपणांस नवीन सृष्टी निर्मावयाची आहे, याची सर्वांना जाणीव असते. सर्वांना उत्कटता असते. तळमळ असते. परंतु हे सारे प्रयत्न अलग होत असतात.

मनात काही तरी कल्पना असते. परंतु ही कल्पना स्पष्ट नसते. ध्येय अस्पष्ट असे डोळ्यांसमोर असते. हे अस्पष्ट ध्येय स्पष्ट करण्यासाठी अवतार लागत असतो. तो येतोच. ती सामाजिक जरुरीच असते. अवतार अकस्मात होत नाही. धूमकेतूसारखा तो कोठून तरी येतो असे नाही. लाखो लोकांच्या अस्पष्ट प्रयत्नांतून स्पष्ट ध्येय देणारा अवतार सृष्टीच्या नियमानुसारच उत्पन्न होत असतो.

भिरीभिरी फिरणारे अणू ज्याप्रमाणे स्थिर होतात, त्याप्रमाणे भिरीभिरी फिरणारे सामान्य जीव ध्येयाची स्पष्ट दिशा दाखविणा-याभोवती स्थिर होतात. लोखंडाचे अणू ज्याप्रमाणे चुम्बकाभोवती येतात, ग्रह ज्याप्रमाणे सूर्याभोवती फिरू लागतात, त्याप्रमाणे धडपडणारे जीव धडपडीचे गन्तव्य दाखविणा-या महापुरुषाभोवती फिरू लागतात.

श्रीरामचंद्राचा जन्म होण्यापूर्वीच वानर धडपडत होते. त्या वानरांच्या धडपडीत रामाचा जन्म होता. गोकुळातील गोपाळांच्या धडपडीत श्रीकृष्णांचा जन्म होता. गोपाळांच्या हातांत काठ्या होत्या, परंतु त्या काठ्यांना एका ध्येयावर केन्द्रित करण्यासाठी श्रीकृष्णाची आवश्यकता होती. हातांत काठ्या घेऊन फिरणा-या त्या गोपाळांना कृष्ण हाक मारून म्हणाला 'या रे, या रे अवघे जण. इंद्राचा हा जुलूम दूर करावयाचा आहे ना ? या, गोवर्धन पर्वत सारे मिळून उचलू. लावा एकदम काठ्या. एका ध्येयासाठी सारे उठा.' गोपाळांनीच काठ्या उचलल्या. त्यांनीच पर्वत उचलला. कृष्णाने काय केलं ? केवळ बोट दाखविले. येथे काठ्या लावा, येथे एके ठिकाणी या, पर्वत उचला, हा जुलूम दूर करा. कृष्ण नुसते दिग्दर्शन करीत होता. अवतारी पुरुष जनतेच्या प्रयत्नांना विशिष्ट दिशेने वळण देतो. जनतेचीच शक्ती, परंतु ती केंद्रीभूत व सुसंघटित नसल्यामुळे कार्यरत नव्हती. परंतु त्या शक्तीला व्यवस्थित स्वरूप देताच ती अमोघ होते; तेजस्वी, अप्रतिहत होते. सर्व संकटांचा ती चुरा केल्याशिवाय राहात नाही.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel