मंदिरातील मूर्तीसमोर आपण भक्तिप्रेमाने, कृतज्ञतेने काही अर्पण करतो; परंतु आपण देवासमोर जे ठेवतो त्याचा उपयोग काय होतो ? देव तर तटस्थ आहे. पुजारी किंवा मालक ते सर्व घेत असतो. आणि त्या पवित्र मंदिरात व्यभिचारांची पूजा सुरू होते ! रामाला वाहिलेला शेला मंदिराचा जो मालक त्याच्या वेश्येच्या अंगावर झळकतो ! रामाला दिलेले हिरे वारांगनांच्या नाका-कानांत जाऊन बसतात !

आपली होते देवपूजा आणि समाजात वाढते घाण ! परंतु हे होणारच. लोकांना पिळून, छळून आणलेले ते हिरे रामरायाला कसे सहन होतील ? ते घाणेरडे हिरे घाणीतच जावयाचे. आपल्याजवळ देवाला द्यावयाला आले कोठून ? आपल्यासाठी झिजणा-या आपल्या बांधवांची झीज आपण भरून काढीत नाही, म्हणून ही धनदौलत उरते. आपले मन आपणास खाते. त्या मनाचे मारून मुटकून समाधान करण्यासाठी आणि गोरगरिबांना छळूनही पुन्हा प्रतिष्ठित व धार्मिक म्हणून मिरवता यावे यासाठी आपण देवाला हिरे-माणके देतो. लक्षावधी, कोट्यवधी, इस्टेटीतील केरकचरा देवापुढे टाकतो. झब्बू लोक धर्मात्मा म्हणून वर्तमानपत्रांतून स्तुती करतात. गरिबांची वर्तमानपत्रे असती तर त्यांनी काय बरे लिहिले असते ?

मंदिरांतून जो व्यभिचार चालतो त्याचे पाप तेथे दिडक्या फेकणारांवर आहे. आपण जे काही करतो, त्याचे परिणाम काय होतील हे न पाहणे म्हणजे घोर अधर्म आहे. देवाने दिलेल्या बुध्दीचा तो अपमान आहे. ईश्वराने दिलेल्या परमश्रेष्ठ देणगीचा तो उपमर्द आहे.

द्वारकेसारख्या मोठमोठ्या देवस्थांनांचे लिलाव होतात ! जसे दारूच्या गुत्त्यांचेच लिलाव ! जो मक्ता घेईल तो मग तेथला राजा. द्वारकेला तो मक्ता घेणारा महंत डुलत डुलत डुलत येतो. त्याच्यावर छत्रचामरे ढाळण्यात येतात. तोच जणू तेथील देव !

मूर्तिपूजेत घाण शिरली आहे. डोळस मूर्तिपूजा सुरू झाली पाहिजे. मूर्तीपुढे धनद्रव्य टाकणे बंद झाले पाहिजे. जेथे सर्वांनी विनम्रभावाने यावे असे स्थान म्हणजे मंदिर. ते स्थान सरकारने स्वच्छ, पवित्र राखावे. तेथे मंगल भाव मनात येतील असे करावे म्हणजे झाले. पवित्र मंदिरात पवित्र होऊन बाहेरच्या जगात पवित्र व्यवहार करण्यासाठी जाणे, हा मूर्तिपूजेचा हेतू आहे. भारतीय संस्कृतीत मूर्तिपूजेचा महान महिमा आहे. ज्या संस्कृतीत मूर्तिपूजा आहे, त्या समाजात प्रेम, स्नेह, दयेचे पूर वाहिले पाहिजे होते; परंतु मोठ्या खेदाची गोष्ट ही की, श्रेष्ठ-कनिष्ठ भावांची भुते या मंदिरांतही धुडगूस घालीत आहेत ! आमच्या देवांच्या मूर्तीही बाटतात व विटाळतात ! जेथे देवही पतित व भ्रष्ट होऊ लागला, तेथे शुध्दी कोण करणार ? भूदेव ब्राह्मण !

खरोखर, मंदिराची जरूरच नाही. या विश्वमंदिरात अनंत मूर्ती आहेत. या विश्वातील प्रत्येक अणुरेणूवरून या विश्वाच्या पाठीमागच्या शक्तीची कल्पना येते. एका अरबाला एका ख्रिश्चन मिशन-याने विचारले, 'देव आहे हे तुला कोणी शिकविले ?' तो अरब म्हणाला, 'या वाळवंटातील झुळझुळ वाहणा-या झ-याने; या वाळवंटात वाढणा-या, रसाळ फळे देणा-या खजुरीच्या झाडांनी; रात्री दिसणा-या हिरव्या-निळ्या ता-यांनी.' तो मिशनरी खाली मान घालून निघून गेला.

जिकडे तिकडे देवाच्या मूर्ती आहेत. तारे पाहून हात जोडावेसे वाटतात. फुले पाहून हात जोडावेसे वाटतात. थोर व्यक्ती पाहून प्रणाम करावासा वाटतो. भव्य देखावा पाहून नमावेसे वाटते. अनंत विश्वातील अनंत मंदिरे व अनंत मूर्ती ! परंतु पाहतो कोण ?

विवेकानंद म्हणाले, 'ज्या मूर्तिपूजेने जगाला श्रीरामकृष्ण परमहंस दिलें, त्या मूर्तिपूजेत सहस्त्र दोष शिरले असले तरी ती मी उराशी धरीन.' साधन पवित्र असते; परंतु स्वार्थी लोक ते भ्रष्ट करतात. गंगा पवित्र आहे; परंतु तिला घाण करणारे भेटले, तर ती बिचारी काय करणार !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel