या किंमती कोण ठरवितो? हे मोल कसे निश्चित करावयाचे? एखाद्या मिलचा मालक म्हणतो, ''मी प्रथम माझे भांडवल घातले. मी हिंडलो, शेअर जमविले, भांडवल वाढविले. सर्व योजना आखली, संघटना केली, म्हणून ही गिरणी उभी रहिली. माझ्या कर्तबगारीची किंमत करता येणार नाही. मजुराना थोडीशी मजुरी देऊन बाकी उरेल तो सारा फायदा माझ्या संघटनाबुध्दीची, माझ्या कल्पकतेची, माझ्या या व्यवस्थाचातुर्याची किंमत आहे. मी ती घेणार यात अन्याय नाही. यात अधर्म नाही. माझ्या विशेष गुणांचा मोबदला मी का न घ्यावा?''
परंतु या लोकांना समजत नाही की तो तो गुणसुध्दा विशिष्ट वातावरणामुळे व परिस्थितीमुळे त्यांना मिळाला. मनुष्यांचे गुण हे समाजनिर्मित आहेत. त्या गुणांचे श्रेय त्याला नसून विशेष परिस्थितीला आहे. त्या गुणांची ऐट मनुष्याला नको. निरनिराळे गुण माणसात आढळतात. त्या गुणांचा अभिमान त्याला नको. त्या त्या गुणांसाठी त्याने समाजाचे ऋणी राहिले पाहिजे आणि त्या गुणांचा फायदा समाजाला दिला पाहिजे.
एखादा बलभीम येऊन जर म्हणेल, ''मी बलवान आहे. माझ्या शक्तीचा मी वाटेल तसा उपयोग करीन. इतरांस तुडवीन, बुडवीन, छळीन, पिळीन,'' तर ते योग्य होईल का? माझ्या जवळ शक्ती आहे ती इतरांच्या रक्षणार्थ आहे. दुस-यांच्या कल्याणासाठी आहे. कारण माझी शक्ती माझी नाही. तीही समाजाने दिली आहे. समाजाने मला खायला; प्यायला दिले. सृष्टीने मला प्रकाश दिला, हवा दिली. म्हणून मी जगलो बलवान झालो. माझी शक्ती मी मला वाढविणा-या समाजाच्या सेवेत खर्चिली पाहिजे.
भारतीय संस्कृती सांगते की आपापल्या वर्णांप्रमाणे सेवेची कर्मे उचला. परंतु त्या कर्मात प्रतवारी लावू नका. बौध्दीक कर्माची विशेष किंमत, शारीरीक श्रमांची कमी किंमत असे नका लेखू. कोणत्या कर्माची कोणत्या क्षणी किती किंमत येईल, त्याची कल्पना करता येणार नाही. ज्याने त्याने आपापल्या विशिष्ट गुणधर्माप्रमाणे, आपल्या शक्तीप्रमाणे, आपल्या पात्रतेप्रमाणे कर्म करावे. ज्याला देखरेख करता येईल. त्याने देखरेख करावी, यंत्र दुरुस्त करता येईल त्याने यंत्र दुरुस्त करावे, यंत्र चालविता येईल त्याने ते चालवावे. कर्मे निरनिराळी असली म्हणून त्यांचा मोबदला कमीअधिक नको.
लायकीप्रमाणे काम व जरुरीप्रमाणे मोबदला. हा धार्मिक अर्थशास्त्राचा सिध्दात आहे. दोन मजूर आहेत. एक अधिक कुशल आहे, दुसरा तितका नाही, परंतु जो कुशल आहे, त्याला दोनच मुले आहेत व जरा कमी कुशल आहे त्याला चार मुले आहेत असे समजा. तर हुशार मजुरापेक्षा त्या कमी कुशल मजुराला अधिक मजुरी द्यावी लागेल. कारण त्याची गरज अधिक आहे, समाजाने त्या मुलांची स्वतंत्र रीतीने तरी व्यवस्था करावी किंवा त्या मजुराला मजुरी तरी अधिक द्यावी.
कारकुनाला चार मुले असतील व मामलेदाराला मुळीच मूल नसेल, तर कारकुनाला पन्नास रुपये पगार द्यावा व मामलेदाराला पंधरा द्या. मामलेदार झाला. म्हणजे तो खंडीभर खातो अशातला भाग नाही. पगार हा आवश्यक गरजा भागविण्यासाठी आहे. मामलेदाराला हिंडावे लागत असेल तर त्याची व्यवस्था सरकार निराळ्या रीतीने करील. परंतु केवळ खाण्यापिण्यासाठी म्हणून अधिक पगार नको. मामलेदाराकडे पुष्कळ लोक येणार. जाणार त्यांच्यासाठी कायमचा एक बंगला बांधून ठेवण्यात येईल म्हणजे झाले.