आहाराचा विचारांवर परिणाम होतो, असे काही म्हणू लागले. “आहारशुद्धे सत्त्वशुद्धिः” अशी तत्त्वे रुढ होऊ लागली. निरनिराळे खाण्याचे प्रयोग होऊ लागले. ‘नुसते मांसाशन करून बुद्धी चांगली होत नाही. ओदन व मांस या दोहोंच्या सेवनाने बुद्धी तेजस्वी होते’ असे कोणी म्हणू लागले. अशा रीतीने हळूहळू मांसाशनांकडून जनता वनस्पत्याहाराकडे अधिकाधिक वळू लागली.
जी नवी दीक्षा द्यावयाची, जे नवीन व्रत द्यावयाचे, तेच अत्यंत उत्कटपणे सांगावयाचे हा नेहमीचा ध्येयवादी पुरुषांचा नियम येथेही दिसतो. ओदन म्हणजे देव, ओदन म्हणजे परमेष्ठी. ओदन श्री देईल, सर्व काही देईल ; असे मंत्रातून सांगण्यात येऊ लागले. गायीच्या दुधातुपाचाही याच वेळेस महिमा वाढविण्यात येऊ लागला. मांसानेच आयुष्य वाढेल असे नाही ; हे तूप म्हणजेच आयुष्य, हे तूप म्हणजेच सर्व काही. तूप खा. देवांना तूपच आवडते.
आयुर्वै घृतम्
अशी ब्रीदवाक्ये फडकू लागली. घृताचा व ओदनाचा महिमा अशा रीतीने हे मांसाशननिवर्तक वाढवीत होते.
माणसाचे नरमांस सुटले, गोमांस सुटले, परंतु इतर मांसे सुटली नाहीत. गायीचा महिमा कळला, परंतु बोकडाचे मांस का खाऊ नये, कोकराचे मांस का खाऊ नये, हे माणसाला समजेना ! शेळ्या, मेंढ्या, बक-या त्याला पाळाव्या लागत. दुधासाठी, लोकरीसाठी, त्या पाळण्यात येत ; परंतु बोकड, बकरे यांची वास्त काय लावायची ? मनुष्य त्यांना खाऊ लागला. त्यांचे हवी देऊ लागला. देवांना त्यांचे बळी मिळू लागले ; ज्याप्रमाणे बकरे, बोकड तसेच हरणांचे. हिंदुस्थानात हरणांचे मोठेमोठे कळप आजही दिसतात. प्राचीन काळी हिंदुस्थान हरणांनी गजबजलेले असेल. कृषी करू पाहणा-या समाजाला हरणांपासून त्रास होत असेल. मांसाशन कमी कमी होऊन मनुष्य कृषीकडे अधिक लक्ष देऊ लागला ; परंतु जिकडे तिकडे हरणांचे कळप. शेती नीट होईना. हरणांना मारणे हा राजाचा धर्म झाला. शेतीचे रक्षण करणे हा राजधर्म होता. राजे मृगयेला निघत. मृगया म्हणजे गंमत नव्हती ! लीलेने खेळ म्हणून हरणाचे कोवळे प्राण घेणे हा त्यात हेतू नव्हता. मृगया ही नृपाची लीला नसून त्याचा धर्म होता. शेती सांभाळण्यासाठी हा कठोर धर्म पाळावा लागे. राजाने ते मृगयेतील मांसच खावे असाही दंडक होता. जिभेसाठी आणखी हिंसा त्याने करू नये ; हे हरणाचे मांसच त्याने पवित्र मानावे, तेच भक्षावे.
हरणे मारली जात याचे दयावंतांना वाईट वाटे. परंतु अपूर्ण मनुष्याचा इलाज नव्हता. आश्रमातून मुद्दाम हरणे थोडी सांभाळली जात. ऋषींचे आश्रम म्हणताच हरणे डोळ्यांसमोर येतात. शाकुंतलातील हरणावरचे प्रेम डोळ्यांत पाणी आणते. राजेलोक लाखो हरणे शेतीसाठी मारीत. त्या हरणांच्या कातड्यांना पवित्र मानण्यात आले. आपल्या शेतीसाठी हरणे मारावी लागली; त्या हरणाचे कातडे आपण बसायला घेऊ. जानव्यात त्याच्या कातड्याचा तुकडा घालू. हरणाला मारावे, परंतु ही मारल्यानंतरची कृतज्ञता होती. अपूर्ण मानवाची ही हृदयातील भावना होती.
विचारप्रवाह चाललाच होता. मांसाशननिवृत्तीचे प्रयोग होतच होते. मांस एकदम तुम्हांला सुटणार नाही हे खरे; पण मधून मधून खात जा, असे सुधारक सांगू लागले, “रोज बोकड-कोकरे नका मारू. यज्ञात मारले तरी चालेल. यज्ञाच्या वेळेस हजारो लोक येतात. मेजवानी होते. त्या वेळेस हवे तर खा मांस.” असे ऋषी सांगत. परंतु लोक काय, पडत्या फळाची आज्ञा। “यज्ञात मांस खाल्ले तरी चालेल” असे म्हणताच दररोज यज्ञ होऊ लागले! बारा-बारा वर्षे चालणारे यज्ञ होऊ लागले, आणि ते पुन्हा देवासाठी!