श्रीकृष्ण व त्याची मुरली

भारतीय हृदयाचे दोन चिरंजीव राजे आहेत. एक अयोध्याधीश राजा रामचंद्र, व दुसरा द्वारकेचा राणा श्रीकृष्ण. इतर शेकडो राजेमहाराजे झाले व गेले; पण या दोन राजांचे स्थान अढळ आहे. त्यांच्या सिंहासनावर दुसरा कोणताही सत्ताधीश बसू शकणार नाही. भारतीय संस्कृती म्हणजे राम-कृष्ण.

कृष्णाच्या चरित्राकडे एका अगदी निराळ्या प्रकाराने या प्रकरणात मी पाहणार आहे. गोकुळात प्रेमस्नेहाचा साम्यवाद स्थापन करणारा, किंवा जरासंध-शिशुपालादी सम्राटांना धुळीस मिळविणारा, छळल्या जाणा-या द्रौपदीसारख्या सतींची बाजू घेणारा, किंवा अर्जुनाचे घोडे प्रेमाने हाकणारा, अशा त्या कृष्णाचे वर्णन या प्रकरणात नाही. कृष्णाकडे एक प्रत्यक्ष व्यक्ती या दृष्टीने येथे मी पाहणार नाही. कृष्णाकडे एक प्रतीक या दृष्टीने पाहणार आहे.

गोकुळातील श्रीकृष्ण यात फार खोल अर्थ आहे. गोकुळ म्हणजे काय ? गो म्हणजे इंद्रिये. गायी ज्याप्रमाणे हिरवा चारा पाहून वाटेल तेथे चरत जातात, त्याप्रमाणे ही इंद्रिये ते ते विषय पाहून त्यांच्या पाठीमागे स्वैर पळत सुटतात. आपले जीवन म्हणजेच गोकुळ. कुळ म्हणजे समुदाय. इंद्रियांचा समुदाय जेथे आहे ते गोकुळ. असे गोकुळ आपल्या प्रत्येकाजवळ आहे.

परंतु या गोकुळात आनंद नसतो, या गोकुळात सुखसमाधान नसते. येथे संगीत नसते, मधुर मुरली नसते. येथे व्यवस्था नाही. नृत्य-गीत नाही. या जीवन-गोकुळात सारे बेसूर काम चाललेले असते. इंद्रियांच्या शेकडो ओढी असतात. हे इंद्रिय खेचते, ते इंद्रिय खेचते. मनाच्या शेकडो प्रवृत्ती असतात. त्या प्रवृत्तीत एकवाक्यता नसते. अंत:करणात सारा गोंधळ. सारी आदळ-आपट. या गोकुळात वणवे पेटलेले असतात. अंत:करणाच्या यमुनेत अहंकाराचे कालिये ठाणी देऊन बसतात. अधासुर, बकासुर (बकासुर म्हणजे दंभासुर) या गोकुळात येऊ पाहात असतात. आपल्याला आपल्या हृदयात सारखा गदारोळ व धांगडधिंगा ऐकू येत असतो. रात्रंदिवस हृदयमंथन सुरू असते. आपण समुद्रमंथनाची गोष्ट वाचतो. समुद्रमंथन म्हणजे हृदयसमुद्राचे मंथन. या हृदयसागरावर अनेक वासना-विकारांच्या लाटा प्रत्येक क्षणाला उसळत असतात. या मंथनातून नाना प्रकारच्या वस्तू बाहेर पडतात. कधी लक्ष्मी येऊन मोह पाडते, कधी अप्सरा भुलविते. कधी दारू समोर येऊन उभी राहते. कधी आपण लोकांना चाबूक मारीत सुटतो, तर कधी आपण शंख फुंकतो. कधी प्रेमाचा चंद्र उगवतो, तर कधी द्वेषाचे हलाहल निर्माण होते. कधी सद्विचारांची फुले देणारा पारिजात फुलतो, तर कधी सर्वांना तुडविणारा ऐरावत उभा राहतो. अमृतप्राप्ती होईपर्यंत-खरे समाधान, खरी शांती यांचा लाभ होईपर्यंत- हे असे हृदयमंथन सुरूच राहणार.

आपल्या या हृदयातील अशांतीने आपली तगमग होते. द्वेष-मत्सरांनी मस्त झालेल्या अशा जीवन-गोकुळात शेवटी कृष्ण जन्माला येतो. वसुदेव-देवकीच्या पोटी कृष्ण जन्मला; नंद यशोदेने त्याचा प्रेमाने प्रतिपाळ केला. नंद म्हणजे आनंद. यशोदा म्हणजे यश देणा-या सद्वृत्ती. आनंदासाठी तडफडणारा हा जो जीवात्मा आणि या जीवात्म्याला साहाय्य करणा-या ज्या सत्ववृत्ती यांच्या तळमळीतून हा श्रीकृष्ण जन्माला येतो. हृदयातील मोक्षाची तळमळ म्हणजेच कृष्णजन्म.

कृष्णजन्म व रामजन्म केव्हा झाला ते आपण जर पाहू लागलो, तर त्यात केवढा अर्थ आपणांस दिसेल. रामजन्म भर दुपारी झाला.

टळटळीत दुपारी जन्मला रामराणा. पाय भाजत आहेत, कोठे छाया नाही, कोठे विसावा नाही, अशा वेळी राम जन्मास येतो. ज्या वेळेस जीवात्मा तडफडत असतो, हृदयाची दु:खाने लाही लाही होत असते, संसार म्हणजे पेटलेला वणवा असे वाटते, अशा वेळेस जीवात्म्याला रमविणारा, हृदयातील दशेन्द्रियमुखी सम्राट रावणाला मारून टाकणारा राम जन्म घेत असतो.,

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel