भक्ती

व्यक्तीने स्वतःच्या वर्णानुसार म्हणजेच स्वतःच्या गुणधर्मानुसार समाजाची सेवा करावयाची हे आपण पाहिले. ही सेवा केव्हा बरे उत्कृष्ट होईल ? या सेवेच्या कर्माने आपण कसे बरे मुक्त होऊ ?

मुक्त होणे म्हणजे तरी काय ? मुक्त होणे म्हणजे बांधलेले नसणे. मुक्त होणे म्हणजे मोकळे आहोत असे वाटणे. आपणांवर कोणतेही दडपण नाही असे अनुभवास येणे म्हणजेच मुक्त होणे. ना वासनांचा गुलाम, ना जगात कोणत्याही सत्तेचा गुलाम. स्वतःच्या समाधानाने, आनंदाने, उत्साहाने कर्म करीत राहणे म्हणजेच मोक्ष होय.

आपण हजारो कर्मे करीत असतो ; परंतु त्यांचा आपणांवर बोजा असतो. त्या कर्मामुळे आपण मेटाकुटीस येत असतो; आपण त्रस्त होत असतो. रडकुंडीस येत असतो. असे का होते ? याची दोन कारणे आहेत. एक तर, जे कर्म आपण करीत असतो ते आपल्या आवडीचे नसते. ते आपल्या वर्णाचे नसते. तो परधर्म असतो. परंतु मोहाने तो अंगीकारलेला असतो. असा हा परधर्म भयावह असणार, आपणास संत्रस्त करणार. हे गीता गर्जून सांगत आहे.

एखादा शिक्षक घ्या. ज्याला शिक्षक-कर्मात आनंद नाही, मुलांच्या हार्दिक व बौद्धिक विकासात आनंद नाही, अशा शिक्षकाला त्या अध्यापनकार्यात कसा आनंद वाटेल ? मुलांचे गृहपाठ तपासताना तो संतापेल. त्यांची प्रश्नोत्तरपत्रे तपासताना तो भराभर रेघोट्या मारील. त्यांच्या शंका ऐकून चिडेल. नवीन ग्रंथ वाचण्याला त्याला बोजा वाटेल. अशा शिक्षकाला सारखे वाटत असेल, की दिवाळीची सुट्टी कधी येईल, नाताळ केव्हा येईल, मे महिना कधी उजाडेल ? ते शिक्षकाचे कर्म त्याच्या उरावर बसते. ते भूत त्याच्या मानगुटीस बसते. परंतु पोटासाठी म्हणून तो ते रडतखडत, चिडत-चरफडत करीत असतो. तो त्याचा वर्ण नसतो.

आज सर्व समाजात हेच दिसत आहे. वर्णाला स्थानच नाही. त्यामुळे वाटते ते कर्म वाटेल तो करीत आहे. आवड असो वा नसो, ते ते गुणधर्म असोत वा नसोत, पोटाला मिळेल ना? उचला ते काम, करा कसेतरी, असे होत आहे. ज्या समाजात अशी कर्मे होत असतात, त्या समाजाला कळा कशी चढणार ? तो समाज सुखी, समृद्ध कसा होणार ?

ज्या समाजातील कर्मात तेज नाही, आनंद नाही, उत्साह नाही, श्रद्धा नाही; त्या कर्माने त्या कर्म करणा-यालाही असमाधान, व ते कर्म नीट न झाल्यामुळे समाजाचेही नुकसान. स्वतःचा अधःपात व समाजाचाही अधःपात. स्वतःची प्रतारणा व समाजाचीही वंचना.

जे कर्म आपल्या आवडीचे असते त्याचा कंटाळा आपणांस येत नाही. कोकिळाला जर आपण म्हणू, “आज तू सुट्टी घे, आज कुहू करू नकोस” ; तर तो म्हणेल, “एक वेळ खाणेपिणे नसले तरी चालेल, परंतु मला कुहू करू दे. त्याने मला त्रास नाही. तो माझा आनंद आहे. ते कुहू करणे म्हणजेच माझे जीवन.” सर्व सृष्टीत हेच आहे. सूर्य-चंद्र, तारे-वारे यांना रविवारची सुट्टी नाही. समुद्र सारखी गर्जना करून राहिला आहे. नद्या जीवन असेपर्यंत सारख्या वाहात आहेत. जीवन आहे तो विश्रांती नाही. विश्रांतीची जरूरच नाही. कर्म म्हणजे विश्रांती. कारण कर्म म्हणजेच आनंद !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel