कर्मफलत्याग

श्रीगीतेने कर्मफलत्याग शिकविला आहे. ज्ञानविज्ञानपूर्वक निष्ठेने व जिव्हाळ्याने स्ववर्णानुसार म्हणजे स्वतःच्या आवडीचे सेवाकर्म करावयाचे. ते कर्म उत्कृष्टपणे पार पाडता यावे म्हणून जीवन संयत करावयाचे. आहारविहार नियमित करावयाचे. शरीर आणि मन प्रसन्न आणि निरोगी राखावयाचे. अशा रीतीने जीवन सार्थकी लावावयाचे. सेवाकर्म करीत करीत, उत्तरोत्तर अधिकाधिक तन्मयतेने करीत एक दिवस सर्व सृष्टीशी सख्य जोडावयाचे, मन भेदातीत करून केवळ चिन्मयाच्या साम्राज्य़ात रमावयाचे.

परंतु हे सर्व साधावयास आणखी एक वस्तू पाहिजे. आणखी एक दृष्टी पाहिजे. ती दृष्टी म्हणजे फळाची आशा करीत न बसणे. कर्मातच इतके रमावयाचे, की फलाचा विचार करावयास अवसरच नाही. कर्ममयच जीवन. “देवचि खावा, देवचि प्यावा” असे जनाबाई म्हणे. देव म्हणजे आपले ध्येय. आपले सेवाकर्म. हे सेवाकर्मच खावयाचे, सेवाकर्मच प्यावयाचे. याचा अर्थ खातानाही कर्माचाच विचार. पितानाही कर्माचाच विचार. झोपेतही कर्माचेच चिंतन. महात्माजी मागे एकदा म्हणाले होते, “मला हरिजनांच्या सेवेचीच स्वप्ने पडतात. मंदिरे उघडताहेत असे दिसते.” रामतीर्थांना झोपेत गणितांची कूटे सुटत. अर्जुनाची गोष्ट अशी सांगतात. अर्जुनावर श्रीकृष्णाचे प्रेम फार म्हणून उद्धव अर्जुनाचा हेवा करी श्रीकृष्णाच्या ध्यानात ते आले. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाला, “उद्धवा ! अर्जुन काय करतो आहे ते बघून ये.” उद्धव निघाला. अर्जुन खोलीत गाढ झोपला होता. परंतु तेथे ‘कृष्ण कृष्ण’ असा मंजुळ ध्वनी ऐकू येत होता. तो आवाज कोठून येत होता ? उद्धव पाहू लागला. शोधू लागला. तो अर्जुनाजवळ गेला. त्याला काय दिसले ? अर्जुनाच्या रोमारोमांतून ‘कृष्ण कृष्ण’ असा ध्वनी येत होता. कृष्णाचे प्रेम अर्जुनाच्या जीवनात ओतप्रोत भरले होते. नानकाने म्हटले आहे, “देवा ! तुझे स्मरण श्वासोच्छवासाप्रमाणे होऊ दे.” देवाच्या स्मरणाशिवाय जीवन असह्य होऊ दे. त्याचे स्मरण म्हणजे जीवन, त्याचे विस्मरण म्हणजे मरण. त्याचे स्मरण म्हणजे सकल सुख, त्याचे विस्मरण म्हणजे परम दुःख.

“विपद् विस्मरणं विष्णोः संपन्नारायणस्मृतीः”

आणि देवाचे स्मरण म्हणजे ध्येयाचे स्मरण. स्वकर्माचे, स्वधर्माचे स्मरण. ज्याच्यासाठी जगावेसे वाटते, ज्याच्यासाठी मरावेसे वाटते ते आपले दैवत. तो आपला देव. त्याच्या चिंतनात सदैव रमणे म्हणजेच परमसिद्धी.

मनुष्य स्वकर्मात इतका कधी रंगेल ? ज्या वेळेस त्या कर्मापासून मिळणा-या फळाला तो विसरेल तेव्हाच. लहान मूल असते. ते आंब्याची बाठ घेऊन जमिनीत पुरते. दुस-या दिवशी सकाळी उठून ती बाठ ते मूल पुन्हा उकरून पाहते. अंकुर फुटला आहे की नाही ते पाहण्याची त्यास उत्कंठा असते. परंतु जर ती बाठ घटकेघटकेला अशी उकरून पाहण्यात आली, तरी तिला कधीही अंकुर फुटणार नाही, कधीही मोहोर येणार नाही, रसाळ फळे लागणार नाहीत. याच्या उलट, त्या बाठीला रोज पाणी घालण्यात आले, खत घालण्यात आले, बकरीने पाने खाऊ नयेत म्हणून कुंपण करण्यात आले, आणि अशा रीतीने त्या आम्रसंवर्धनाच्या कर्मातच जर मनुष्य रमला, तर वर एके दिवशी रसाळ फळे डोलल्याशिवाय राहणार नाहीत. मनुष्याचा खरा आनंद फलात नसून कर्मातच आहे, असे खोल पाहिले तर दिसेल. आपले हातपाय, आपले हृदय, आपली बुद्धी ही सदैव सेवाकर्मात रंगलेली असण्यातच आनंद आहे. इंग्लंडमधील प्रख्यात इतिहासकार गिबन ज्या मध्यरात्री त्याचा तो प्रचंड इतिहास लिहून संपला, त्या वेळेस रडला ! बारा वाजून गेले होते. प्रशान्त रात्र होती. शेवटचे वाक्य लिहून झाले. पंचवीस वर्षे तो उद्योग गिबनचा चालला होता. प्रत्येक क्षण आनंदात गेला. परंतु तो इतिहास संपताच त्याला वाईट वाटले. तो म्हणाला, “आता उद्या काय करू ? उद्या कोठला आनंद ? आता काय वाचू ? काय लिहू ?” ते कर्म करण्यातच त्याचा आनंद होता.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel