अमावास्येला आपणांस अंधार दिसतो. अमावास्येला चंद्र नाही असे वाटते. परंतु समुद्राला सर्वात मोठी भरती अमावास्येच्या दिवशीच येत असते. अमावास्या म्हणजे मोठी पर्वणी. अमावस्येला चंद्र-सूर्याची भेट होत असते. चंद्र सूर्याशी एकरूप होऊन जातो. त्याप्रमाणे मरण म्हणजे जीवनाची अमावास्या होय. जीवन शिवाशी मिळून जीवात्मा परमात्म्याशी एकरूप होतो. जीव दिसत नाही, कारण तो विश्वंभरात विलीन झालेला असतो. अमावस्येला सर्वांत मोठी भरती. त्याप्रमाणे मरण म्हणजे अनंत जीवनात मिळून जाणे. मरणाची अमावस्या म्हणजे जीवनाची मोठी पूर्णिमा होय.
देशबंधू दास यांनी मरणसमयी एक सुंदर कविता केली होती. त्या कवितेत ते म्हणतात :
"प्रभो ! माझ्या ज्ञानाभिमानाचे गाठोडे माझ्या डोक्यावरून आता उतर. माझ्या पोथ्या-पुस्तकांची पोटली माझ्या खांद्यावरून खाली घे. हा बोजा वाहून वाहून मी आता जीर्णशीर्ण झालो आहे. माझ्यात राम नाही. मी सारखा धापा टाकीत आहे. पावलागणिक मला दम लागत आहे. डोळ्यांसमोर काळोखी येत आहे. उतर, माझा भार उतर.
"डोक्यावर मोरमुकुट आहे, हातात बासरी आहे, असा तो राधारमण श्यामसुंदर गोपाळ पाहावयासाठी माझ्या प्राणांना तहान लागली आहे.
"आता वेद नको, वेदान्त नको. सारे विसरून जाऊ दे. ते तुझे अनंत राज्य मला आता दिसत आहे. प्रभो ! तुझ्या कुंजद्वारात मी आलो आहे. माझ्या प्रिय अशा त्या द्वारात मी आलो आहे. माझा विझू पाहणारा दिवा पुन्हा प्रज्वलित करण्यासाठी तुझ्या दारात मी आलो आहे.'
मरण म्हणजे तेल संपत आलेला दिवा भरून आणणे; नंदादीप पुन्हा प्रज्वलित करणे. प्रकाश आणण्यासाठी जाणे म्हणजे मरण. किती सहृदय आहे ही कल्पना ! जगण्याचा कंटाळा नाही. सेवेचा कंटाळा नाही.
तुका म्हणे गर्भवासी । सुखें घालावें आम्हांसी
संतांचे हेच मागणे असते. या अनंत जगात पुन:पुन्हा ते खेळावयास येत असतात. मोठे धैर्याचे असे ते खेळिये असतात.
भारतीय संस्कृतीत मरण म्हणजे अमर आशावाद आहे. भारतीय संस्कृतीसारखी आशावादी दुसरी संस्कृती नाही. मरणानंतर पुन्हा तू खेळावयास येशील. रात्री झोपून सकाळी उठलेले बालक पुन्हा पूर्वीच्या खेळण्यांशी खेळते त्याप्रमाणे आपण मेल्यानंतर पुन्हा पूर्वीच्या गोष्टींस आरंभ करतो. आदल्या दिवशी अर्धवट विणलेले वस्त्र दुस-या दिवशी पुन्हा विणकर विणू लागतो, तसेच आपण करतो. पूर्वीच्या सर्व गोष्टी हळूहळू आपणांस आठवतात. पूर्वीचे ज्ञान आपल्याजवळ येते. पूर्वीचे अनुभव येतात. पूर्वजन्मीच्या इतर सर्व गोष्टींचे विस्मरण पडून ज्ञानानुभवाचा जो अर्क, तो आपणांजवळ असतो. पूर्वजन्मीचे सार घेऊन आपण नवीन जन्माला आरंभ करतो.
काही फुकट जात नाही, आशेने काम कर, हळूहळू तू पूर्ण होशील, असा आशावाद भारतीय संस्कृती देत आहे. धीर सो गंभीर. मरण म्हणजे पुन्हा नवीन जोमाने, नवीन उत्साहाने ध्येयाची गाठ घेण्याची सिध्दता !