गुरू स्वतःचे सारे ज्ञान शिष्याला देतो. त्याच्यापासून तो काहीही लपवून ठेवीत नाही. स्वतःचे महत्त्व कमी होईल म्हणून स्वतःची सर्व ज्ञानपुंजी न देणारे अहंभावी गुरू पुष्कळ असतात. परंतु ते गुरू नव्हते. त्यांचे ज्ञान त्यांच्याबरोबर मरते. ज्या ज्ञानाची आपण उपासना केली, ते मरावे असे कोणास वाटेल ? ख-या गुरुला ज्ञानाचा वृक्ष वाढत जावा असे वाटत असते. ज्ञानरूपाने गुरू अमर होत असतो. मिळविलेले देऊन टाकावयाचे. एके दिवशी श्रीरामकृष्ण परमहंस विवेकानंदांना म्हणाले, “मी सारे तुला आज देऊन टाकतो. माझी सारी साधना आज तुझ्यात ओततो.” केवढा दिव्य तो क्षण असेल ! शिष्याला स्वतःच्या जीवनातील सारे अर्पण करणे !
गुरू म्हणजे विशिष्ट ज्ञानाचे प्रतीक. गुरूच्या विचारतील किंवा सिद्धान्तातील काही चूक शिष्याला आढळली, तर ती चूक सच्छिष्य लपविणार नाही. गुरूने दिलेले ज्ञान अधिक निर्दोष करणे म्हणजेच गुरुपूजा. गुरूच्या चुका उराशी धरावयाच्या नाहीत. तो गुरूचा अपमान होईल. ज्ञानाची पूजा म्हणजेच गुरुभक्ती. गुरू जिवंत असता, तर ती चूक दाखविल्याबद्दल गुरू रागावला नसता. उलट, त्याने शिष्याला पोटाशी धरले असते. त्याचे कौतुक केले असते.
गुरूची अंधळी भक्ती गुरूला आवडत नाही. गुरूचे सिद्धान्त पुढे नेणे, गुरूचे प्रयोग आणखी चालविणे यातच खरी सेवा आहे. निर्भयपणे परंतु नम्रपमे ज्ञानाची उपासना करीत राहणे यात गुरुभक्ती आहे. एका दृष्टीने सारा भूतकाल हा आपला गुरू आहे. सारे पूर्वज आपले गुरू आहेत. परंतु भूतकाळातील काही गोष्टी आता चुकीच्या वाटल्या, तर त्या दूर न करणे म्हणजे भूतकाळाचा अपमान आहे. भूतकाळातील भ्रामक गोष्टी जर तशाच पुढे चालवू तर ते उचित नाही. तो भूतकाळाचा गौरव नाही. तो पूर्वजांचा गौरव नाही. उलट, त्या थोर पूर्वजांना तो उपमर्द वाटेल.
आपणांस प्रिय व पूज्य असे कुटुंबातील कर्ते माणूस जर मेले, तर आपणांस वाईट वाटते. परंतु त्या मृतास मोहाने कवटाळीत का आपण बसतो ? शेवटी त्या प्रिय परंतु मृत माणसाचे प्रेत आपणांस अग्नीच्या स्वाधीन करावे लागते. ते प्रेत घरात ठेवणे म्हणजे सडू देणे. ती त्या प्रेताची विटंबना होईल. त्याप्रमाणे पूर्वजांच्या मृत चालीरीती, सदोष विचारसरणी यांना आपण नम्रपमे आणि भक्तिभावाने मूठमाती देणे यातच पूर्वजांची पूजा आहे.
गुरुभक्ती म्हणजे शेवटी ज्ञानशक्ती हे विसरता कामा नये. पूर्वजांबद्दल आदर म्हणजे पूर्वजांच्या सदनुभर्वांबद्दल आदर. त्यांच्या प्रयत्नांबद्दल आदर. त्यांच्या धडाडीबद्दल, ज्ञाननिष्ठेबद्दल आदर. गुरुची पूजा म्हणजे सत्याची पूजा, ज्ञानाची पूजा, अनुभवाची पूजा, जोपर्यंत मनुष्याला ज्ञानाची तहान आहे. ज्ञानाबद्दल आदर आहे, तोपर्यंत जगात गुरुभक्ती राहणार.
भारतात गुरू शब्दांपेक्षा सद्गुरू शब्दाचा महिमा आहे. सद्गुरू म्हणजे काय ? गुरू त्या त्या ज्ञानप्रांतात किंवा त्या त्या कलेत आपणांस पुढे पुढे नेतो, परंतु सद्रुरू जीवनाची कला शिकवितो. संगीताचा आत्मा तानसेन दाखवील ; चित्रकलेचा आत्मा अवनीन्द्रनाथ दाखवितील ; नृत्यातील दिव्यता उदयशंकर दाखवितील ; सृष्टीज्ञानातील अनंतता श्री. रामन दाखवितील ; परंतु जीवनातील अनंतता कोण दाखविणार ? जीवनातील संगीत कोण शिकविणार ? जीवनातील मधुर नाच कोण शिकविणार ?