गायीच्या स्वरूपात आपण पशूंशी संबंध जोडला; त्याचप्रमाणे पक्ष्यांशीही आपण संबंध जोडले आहेत. ज्यांप्रमाणे सर्व पशूंशी आपण आपल्या दुबळेपणामुळे व अल्प शक्तीमुळे संबंध ठेवू शकत नाही, त्याचप्रमाणे सर्व पक्षीसृष्टीशी आपण संबंध ठेवू शकणार नाही. परंतु जे दोन-चार पक्षी घराच्या आजूबाजूला असतात, त्यांचे आपण स्मरण ठेवतो. आपण जेवावयाच्या आधी काव काव करून कावळ्यांना घास टाकतो. चिमण्या, कावळे हेच आपल्या सभोवतालचे पक्षी. त्यांचे स्मरण आपण करतो. लहान मुलाला जेवताना, “तो बघ काऊ, ती बघ चिऊ,” असे म्हणत म्हणत माता त्याच्या तोंडात घास भरविते.

काऊ काऊ चिऊ चिऊ
येथें बस दाणा खा, येथें बस पाणी पी
बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन् उडून जाई


अशा रितीने माय मुलास खेळवीत असते. ज्या चिमण्या-कावळ्यांच्या संगतीत मुले लहानाची मोठी होतात, त्यांच्याबद्दल कृतज्ञता नको का दाखवायला? कावळ्याला हाक मारून त्या निमित्ताने सर्व पक्ष्यांचे स्मरण मनुष्य करतो. स्वत: जेवावयाच्या आधी गायीच्या निमित्ताने पशूंचे स्मरण केले, कावळ्याच्या निमित्ताने पक्ष्यांचे स्मरण केले.

भारतीय संस्कृतीत पक्ष्यांचा पुष्कळच महिमा आहे. सुंदर सुंदर पक्ष्यांचा आपल्या जीवनात आपण संबंध आणला आहे. भव्य पिसारा उभारणारा मोर आपण कसा विसरू? मोराला आपण पवित्र मानले. सरस्वतीला वीणा हातात देऊन त्या मोरावर बसविले. आपण आपल्या जुन्या लामणदिव्यावर मोराची आकृती करून बसवीत असू. कारण मोराचे दर्शन म्हणजे शुभ दर्शन. पहाट- दिवा लावताच दिव्यावरचा मोर आधी दृष्टीस पडे.

कोकिळेची तशीच गोष्ट. आठ महिने मुकी राहून वसंतऋतू येताच ‘कुऊ कुऊ’ ध्वनीने सर्व प्रदेश नादावून सोडणारी ती कोकीळा ! भर उन्हाळ्यात झाडामाडांना नवपल्लव फुटलेले पाहून त्या कोकिळेच्या प्रतिभेला पल्लव फुटतात. ती ‘कुऊ’ गाणे गाऊ लागते. परंतु ती विनयी असते. लाजाळू असते. झाडांच्या गर्द फांद्यात लपून तेथून ती कुऊ कुऊ करते. तो पवित्र मधुर, गंभीर, उत्कट आवाज म्हणजे सामगायन वाटते; उपनिषदच वाटते. भारतीय संस्कृतीने कोकिळाव्रत घालून दिले. कोकिळेचा आवाज ऐकल्याशिवाय त्या व्रतात जेवावयाचे नसते. तो आवाज कानी पडावा म्हणून हे व्रत घेणा-या बायका दूर दोन दोन कोस रानावनात जातात आणि तो आवाज ऐकल्यावर जेवतात.

जशी कोकिळा तसाच पोपट. पोपट, मैना यांचा आपणांस विसर पडणार नाही. हिरव्या हिरव्या पानासारख्या रंगाचा तो पोपट, कशी त्याची बाकदार लाललाल चोच, कसे सुंदर पंख ! कशी मान मुरडतो, कशी शीळ घालतो ! कसे ते बारीक गोलगोल डोळे ! कसा त्याचा तो काळा कंठ ! कसा तो विठ्ठल विठ्ठल म्हणतो ! कसा बोलतो ! पोपटाला ते पिंज-यात राहणे आवडत नसेल, परंतु माणसाला त्याच्याशी प्रेम जोडावेसे वाटते. त्याची तो काळजी घेतो. स्वत:च्या तोंडात पेरूची फोड धरून ता तो पोपटासमोर करतो. तोंडातील घास पोपटाला देतो. हिरवा हिरवा पिंजरा करून हिरव्या झाडांची त्याला विस्मृती पाडू पाहतो. मनुष्य हे सारे प्रेमाने करतो. पाखराला असे बंधनात घालून प्रेम जोडणे कसेतरी वाटते. परंतु मानवाचा आत्मा इतर सृष्टीशी संबंध जोडण्यासाठी कसा तडफडत असतो. त्याचे हे उदाहरण आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel