प्रेम हे डोळस प्रेम हवे ; तरच कर्म हितपरिणामी होईल. आजकाल विज्ञान कितीतरी वाढले आहे. प्रत्येक कर्मात त्याची जरूरी आहे. स्टोव्ह कसा पेटवावा, पाणी स्वच्छ कसे करावे, कोणती पावडर टाकावी, इलेक्ट्रिकजवळ कसे वागावे, टेलिफोन कसा करावा, सायकल कशी दुरुस्त करावी, इंजेक्शन कसे द्यावे, कोणत्या भाज्या चांगल्या, व्हिटॅमिन्स् कशांत आहेत, कोणते व्यायामप्रकार चांगले कोणती शिक्षणपद्धती चांगली, सदीप व्याख्याने कशी द्यावी, खेड्यांचे आरोग्य कसे सुधारावे, खते कशी तयार करावी, बी किती अंतरावर पेरावे, एक ना दोनशेकडो प्रकारचे ज्ञान आपणांस आपल्या रोजच्या व्यवहारात पाहिजे आहे. आपली प्रत्यहीची कर्मे सुंदर, त्वरित व चांगली व्हावीत म्हणून सर्व प्रकारचे शास्त्रीय ज्ञान आपण हस्तगत केले पाहिजे.
जर प्रेम असेल तरच आपण ज्ञान मिळवू. माझ्या भावावर जर माझे प्रेम असेल, तरच त्याच्यासाठी जे कर्म मी करणार त्यात विज्ञान वापरीन. शाळेतील विद्यार्थांवर प्रेम असेल तरच मी शिक्षणशास्त्राचा अभ्यास करीन ; मुलांचे मानसशास्त्र अभ्यासीन ; मी ते ज्ञान मिळवण्याचा कधीच कंटाळा करणार नाही. प्रेमाला आळस माहीत नसतो.
आज भारतीय संस्कृतीत विज्ञानाचा जवळजवळ अस्तच झाला आहे. विज्ञानाचा दिवा विझला आहे. विज्ञानपूजा लोपली आहे. ही विज्ञानाचा नंदादीप पुन्हा प्रज्वलित केला पाहिजे. एखादा महापुरुष विशिष्ट क्षेत्रात संशोधन करतो. मग त्याचा तो शोध सर्वसामान्य जनतेच्या रोजच्या व्यवहारात येतो. असे संशोधक भारतात उत्पन्न झाले पाहिजेत. संसाराला सुंदरता आणणारे हे विज्ञान-त्यात भिण्यासारखे काहीच नाही. लोक पाश्चिमात्यांना केवळ भौतिक म्हणून तुच्छ मानितात आणि स्वतःला आध्यात्मिकही नाही व भौतिकही नाही. आपण केवळ मढी आहोत !
पाश्चिमात्यांत भौतिक विज्ञानाच्या पाठीमागे अद्वैताची-मानव्याची थोर कल्पना नसल्यामुळे जगात हैदोस घालण्याचे आसुरी कर्म त्यांनी चालविले आहे. त्यांच्या भौतिकतेला आध्यात्मिकतेची जोड मिळाली तर सारे सुंदर होईल. भारतात भेदांचा बुजबुजाट आहे. श्रेष्ठ-कनिष्ठपणाची बंडे आहेत. मुखाने अद्वैत घोकतील व कृतीने दुस-यास लाथ मारतील ! अध्यात्म ग्रंथात आहे. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म आज विलुप्त झाले आहे ते आपण कृतीत आणू या. सर्वांस सुखविण्याची इच्छा धरू या, आणि ही इच्छा मूर्त करण्याकरिता विज्ञानाचीही कास धरू या.
पाश्चिमात्यांत केवळ आध्यात्मिकतेची वाण आहे. परंतु आपण दोन्ही दृष्टींनी दिवाळखोर आहोत. ज्ञान-विज्ञान दोन्ही येथे मरून पडली आहेत. आर्यभट्टांच्या व भगवान बुद्धांच्या या भरतभूमीत पुनरपि ज्ञान-विज्ञानांची जोपासना नाही का सुरु होणार ? अध्यात्मविद्या व भौतिक विद्या यांचा संगन नाही का होणार ?
ईशापनिषदात हीच गोष्ट प्रामुख्याने सांगितलेली आहे. विद्या व अविद्या ; संभूतू व असंभूतू यांचा समन्वय करावयास ऋषीने सांगितले आहे.
विद्यां च अविद्यां च यस्तद्वेदोभयं सह
अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययाऽमृतमश्नुते।।