केनोपनिषदात  म्हटले आहे, ''अविज्ञान विजानताम् । विज्ञांन अविजानताम्।''  जो म्हणेल की मला समजते, त्याला काहीही समजले नाही, आणि जो म्हणेल की मला काही कळत नाही, त्यालाच सारे कळेल. त्याप्रमाणे जे धर्म धर्म म्हणून शंख करतात व लाखो लोकांची उपासमार होत असता सुखात नांदतात, त्यांना धर्म नाही. आणि जे ''धर्मबिर्म आम्हांस समजत नाही, परंतु सारा समाज सुखी, आनंदी, ज्ञानी कसा होईल असा ध्यास आम्हांला लागला आहे. यासाठी आम्ही जगू, मरू. . . ''  असे म्हणतात. व रांत्रदिवस तडफडत काम करतात, रक्ताचा बिंदून बिंदू आटवितात, त्यांच्याजवळ धर्माची पवित्र मूर्ती आहे.

जे का रंजले गांजले । त्यांसी म्हणे जो आपुले ॥
तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा ॥


ज्ञानेश्वरीवर, गीता-भागवतावर प्रवचने करणारे, श्रम न कराता शिरा-पुरी खाणारे, पाद्यपूजा घेणारे, पुड्या खाणारे, सुखात राहून अद्वैतावर भाषणे करणारे, हे संत नव्हेत. त्यांच्याजवळ ना देव, ना धर्म. धर्म त्याच्याजवळ आहे, जो रंजल्या गांजल्याची बाजू घेतो, त्यांना पोटाशी घेतो.

दया करी जे पुत्रांसी । तोचि दासा आणि दासी।

अशा भेदातीत वृत्तीने सर्वांची दु:खे दूर करावयासाठी तो प्राणपर कष्ट करतो. हिंदू-मुसलमान बघत नाही. पीडलेले सारे मजूर-शेतकरी माझे;  त्यांच्यासाठी मी तळमळेन. स्पेनमधील गरीब जनता तडफडत आहे का? एक आणा त्यांना पाठवून दे. पैसा नसेल तर सहानुभूती तरी दाखवू दे. त्यांचे दु:ख ते माझे दु:ख आहे. माझा केवळ सहानुभूतीचा शब्दही त्यांना धीर देईल. आज सारी सृष्टी जवळ येत आहे. आगगाडी, आगबोट, विमान, बिनतारी यंत्रे, आकाशवाणी सर्व साधनांनी मानव जवळ जवळ येत आहे. दूर दूर असलेले भाऊ जवळ येत आहेत. घेऊ दे त्यांना जवळ. त्यांच्यापासून का मी दूर राहू?  माझा हात सर्वांसाठीच आहे. माझे अश्रू सर्वांसाठी आहेत, माझे हृदय सर्व पददलितांसाठी तडफडत आहे, असे जो म्हणेल असा जो वागेल, हे ज्याचे महनीय-स्तवनीय ध्येय, त्याच्याजवळ संतत्व आहे, ऋषित्व आहे. त्याच्याजवळ खरा धर्म आहे. देव कोठे असलाच तर त्याच्याजवळ असण्याचाच संभव आहे.

तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनीं ।

अशा महान सज्जनांजवळ प्रत्यक्ष रोकडा देव आहे.

अग्नी म्हणजे देवांचे मुख. आपणांसाठी झिजलेल्या देवांचे तोंड म्हणजे अग्नी. या, आहूती द्या म्हणजे देव तृप्त होतील.

अग्निर्वैं देवानां मुखम् ।

हा अग्नी कोठे आहे? लाखो श्रम करणा-या लोकांचा जठराग्नी पेटला. आहे, त्या अग्नीत आहुती द्या. त्या श्रमणा-या देवांच्या पोटात आग पेटली आहे, ती आग शांत करण्यासाठी उठा सारे सनातनी, उठा सारे शेठसावकार, उठा धर्माच्या नावाने गप्पा मारणा-या खोतांनो, जमीनदारांनी, संतमहंतांनो, महाराजांनो! हा भावाबहिणीच्या, त्यांच्या गोड मुलांबाळांच्या पोटांतील अग्नी तृप्त करणे म्हणजे महान यज्ञ. म्हणजे खरा धर्म.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel