गायच असा एक प्राणी आहे, जी दुधासाठीही उपयोगी आहे व जिचे पुत्र बैल शेतीसाठी उपयोगी आहेत. मनुष्य तोच प्राणी, तोच पशू अहिंसेशिवाय पाळू शकेल,-ज्यातील नर-मादीचा दोहोंचा उपयोग तो करून घेऊ शकेल. उपयोगाशिवाय आपण कोणासही पाळू शकणार नाही. मानवाचे ते सामर्थ्य नाही. जे काही काम करीत नाहीत, जे काही मिळवीत नाहीत अशा माणसांचाही जर घरात बोजा वाटतो, तर रिकामटेकडे पशू आणखी कोण बाळगणार ?
गाय, बैल, मांजर, कुत्रा वगैरे प्राणी उपयोगी म्हणून माणसाने पाळले आहेत. श्रीकृष्णाने गायीचा अत्यंत उपयोग ओळखला. गोकुळात वाढलेल्या या कृष्णाला गायीचा महिमा कळला. मोठेपणी सर्वत्र गायीचा महिमा तो वर्णू लागला. ‘गवळट कृष्ण’ अशी त्याची थट्टा होऊ लागली. कृष्णही अभिमानाने म्हणू लागला, “होय.” मी नुसता कृष्ण नाही. मी गोपालकृष्ण. गोपाळ हे माझे दूषण नसून भूषण आहे. चक्रवर्ती श्रीकृष्ण म्हणून मिरविण्याची मला इच्छा नाही ; गोपालकृष्ण या नावानेच माझी ओळख जगाला व्हावी अशी माझी इच्छा आहे.”
गाय म्हणजे देवता मानली जाऊ लागली. तिच्या रक्षणासाठी राजे प्राण पणाला लावू लागले. दिलीपराजाने गायीला वाचविण्यासाठी स्वतःचा देह सिहापुढे केला. ज्या वेळेस राष्ट्राला नवीन ध्येय द्यावयाचे असते, त्या वेळेस त्या ध्येयासाठी सर्वस्वाचे बलिदान करावे लागते. ते ध्येय म्हणजेच देव, ते ध्येय म्हणजेच भगवान. आज खादी, चरखा वगैरे गोष्टींसाठी तुरुंगात मरेपर्यंत उपवास करू पाहणारे सत्याग्रही निघाले. त्या त्या नवीन ध्येयासाठी ते ध्येय देणारा कितपत कष्ट करावयास तयार आहे, हे जनता पाहात असते. प्रत्येक ध्येयार्थीला मरणाची परीक्षा द्यावी लागते. गायीचे ध्येय देणा-यांनी असेच केले. समाजाला गोसेवेचे महत्त्व पटविण्यासाठी प्राण देणारे निघाले. आज भारतवासीयांत गायीचा जो एवढा महिमा आहे, तो फुकाफुकी आलेला नाही. परंतु गायीचे दूध न पिता, तिची निगा न राखता उगीच तिची शेपटी तोंडावरून फिरविणे, तिला रस्त्यात नमस्कार करणे, म्हणजे दंभ आहे. असला यांत्रिक धर्म केव्हाही तिरस्करणीयच होय.
एकाएकी गोमांसभक्षण बंद झाले नाही. भवभूर्ती हा थोर महाराष्ट्रीय नाटककार सहाव्या-सातव्या शतकात झाला असावा. त्याच्या उत्तररामचरित या उत्कृष्ट नाटकात वाल्मीकीच्या आश्रमात वसिष्ठ-जनक वगैरे आले. त्या वेळेस अतिथींच्या सत्करार्थ म्हणून कालवड मारण्यात आली, असा उल्लेख आहे. त्या दाढीवाल्या ऋषीने आपली कालवड मटकावली असे आश्रमीय मुले म्हणतात. याचा अर्थ असा, की भवभूतीला आपल्या नाटकात असा उल्लेख घालण्यात संकोच वाटला नाही. कदाचित प्राचीन काळची पद्धत म्हणून नाटककाराने तसे लिहिले असावे.
उपनिषदांतून गोमांसभक्षणाचे उल्लेख आहेत. याज्ञवल्क्यासारखा तत्त्वज्ञानी गोमांस गोड लागते असे म्हणताना आढळतो. परंतु उपनिषदांतच मांसाशन बरे नाही, असे उल्लेख आढळतात. ओदनमहिमा सुधारक ऋषी वाढवू लागले होते.
ओदनमुद्ब्रुवते परमेष्ठी वा एषः
हे ओदन म्हणजे परमेश्वराचे स्वरुप आहे असे म्हणतात, असे हा मंत्रद्रष्टा सांगत आहे. आणि हा मंत्र विशेषतः जेवावयाच्या वेळेस म्हणावयाचा आहे, हे लक्षात ठेविले पाहिजे.