आपण आपल्या मुलांबाळांस पाखरांची नावे ठेवतो. राघू, पोपट, मिठूलाल, मैना, हंसी, चिमणी, कोकिळा वगैरे नावे आपणांस माहित आहेत. अशा रितीने निरनिराळ्या प्रकारचा स्नेहसंबंध, आपलेपणा भारतीय संस्कृतीत पाखराच्या सृष्टीशी जोडण्यात आलेला आहे.

पशूपक्ष्यांप्रमाणे तृण-वृक्ष-वनस्पती यांच्याशीही भारतीय संस्कृती प्रेमळ संबंध जोडते. मनुष्य सर्व वनस्पतींना वाढवू शकणार नाही. ते आकाशातील मेघांचे काम आहे. परंतु आपण एक तुळशीचा माडा लावू. वनस्पतिसृष्टीचा एक प्रतिनिधी म्हणून ही तुळस मानू. तिची आधी पूजा. तिला आधी पाणी. तुळशीला पाणी घातल्याशिवाय बायका पाणी पिणार नाहीत. आधी तुळशीचे स्मरण. तुळशीचे स्मरण म्हणजे सर्व वनस्पतींचे स्मरण.

आपण तुळशीचे वृंदावन रंगवितो. तिचे लग्न लावतो. तिच्या लग्नात आवळे, चिंचा. ऊस या वनस्पतींचेच, वन्य फळांचेच महत्त्व. तुळस जणू कुटुंबातील, एक व्यक्ती. तिला जणू सा-या भावना आहेत. तिचे सारे सोहळे करावयाचे. आपण वटवृक्षाची, पिंपळाची मुंज लावतो. त्यांना पार बांधून देतो.

वनस्पतिसृष्टीतील जणू हे महान ऋषीच. त्यांची पूजा करतो. सृष्टीतील हे थोर ईश्वरी वैभव पाहून आपण प्रदक्षिणा घालतो, प्रणाम करतो.

आवळीभोजन करावे, वनात जेवावे, अशा कितीतरी गोष्टी वनस्पतिप्रेमाच्या आपण निर्माण केल्या आहेत. झाडांच्या पानांवर जेवण्याची व्रते आहेत. देवाला फुले वाहावयाची. परंतु देवाला पत्री फार प्रिय असे आपण ठरविले आहे. देवाला तुळस हवी, बेल हवा, दूर्वा हव्यात, शमी हवी, देवाच्या पूजेच्या निमित्ताने रोज सकाळी आधी फुलांशी भेट, दूर्वा-तुळस-बेलाशी भेट ! घराभोवती तुळसी हव्यात, हिरव्यागार दूर्वा हव्यात, पारिजातक, जास्वंद, धोतरा, कण्हेर, जाई, जुई, गुलाब, मोगरा, चमेली. तगर वगैरे फुलझाडे हवीत. कदंब, आवळी, डाळींब यांची झाडे हवीत. देवाला जी पत्री वाहावयाची ती या सर्व झाडांची पाने सांगितली आहेत. फुले नेहमी नसतात. परंतु पाने तर नेहमी आहेत. देवाला पानच प्रिय आहे. ती पाने रोज आणून वाहा. त्या निमित्ताने फुले, फळझाडे लावू. त्यांच्याशी प्रेमसंबंध जोडू.

भारतीय साहित्यात तरूलता-वेलींचे अपार प्रेम आहे. कालिदासाच्या काव्यनाटकांत पाहा. हे प्रेम तेथे दिसून येईल. शकुंतला आम्रवृक्ष व अतिमुक्तलता यांचे लग्न लावते. झाडावर वेल तेथे दिसून येईल. शकुंतला आम्रवृक्ष व अतिमुक्तलता यांचे लग्न लावते. झाडावर वेल वाढवावयाची. वेल झाडाला विळखा देऊन बसते. वेलीमुळे वृक्षाला शोभा, वृक्षामुळे वेलीला आधार. किती कोमल भावना आहेत ह्या ! शकुंतलेचे वर्णन करताना कण्व महर्षी म्हणतात, “शकुंतला झाडांना पाणी घातल्याशिवाय स्वत: आधी पाणी पीत नसे. तिला फुलांची, पल्लवांची हौस होती; तरीही झाडांची फुलें ती तोडत नसे. पल्लव खुडीत नसे.”

अशा शकुंतलेला प्रेमाचा निरोप देण्यासाठी कुलपती कण्व आश्रमातील तरूलता-वेलींना सांगत आहेत. त्या प्रेमळ शकुंतलेच्या वियोगामुळे आश्रमातील वृक्षांनीही, लतावेलींनीही टपटप अश्रू ढाळिले असतील.

राम बारा वर्षे वनवासाला निघाला. परंतु रामाला वनवास म्हणजे संकट नव्हते. रामाला अयोध्येतील त्या पाषाणरचित प्रासादापेक्षा रानावनांतील लताकुंज प्रिय होते. वने-कानने त्याला प्रिय होती. रामायणात रामाला ‘वनप्रिय’ असे विशेषण अनेकदा लाविले आहे. वृक्षवल्ली त्याला सखेसोयरे वाटत होते. राम म्हणताच ‘पंचवटी’ आठवते. विशाल वटवृक्षांच्या शीतल छायेत राम, सीता, लक्ष्मण आनंदाने राहिली. सीतेने पर्णकुटीभोवती झाडे लाविली. गोदावरीचे पाणी घालून त्यांना ती वाढवी. उत्तररामचरित नाटकात पुन्हा पंचवटीत आलेला राम सीतेने लावलेली झाडे पाहून रडतो, असे सहृदय वर्णन आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel