“स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह:” हा श्रीगीतेतील चरण वारंवार म्हटला जातो. या चरणातील धर्म या शब्दाचा अर्थ हिंदु-धर्म, मुसलमान-धर्म असा नाही. येथील धर्म शब्दाचा अर्थ वर्ण असा आहे. अर्जुनाची क्षत्रिय वृत्ती होती. उत्तरगोग्रहणापर्यंत हजारो शत्रूंची मुंडकी चेंडूप्रमाणे उडविणे यात त्याला आनंद वाटत होता. जन्मल्यापासून हाडीमांसी खिळलेली ही क्षत्रिय वृत्ती अर्जुन मोहामुळे टाकू इच्छित होता. तो संन्यासाच्या गप्पा मारू लागतो. भिक्षा मागून जगेन म्हणतो. परंतु हे त्याचे स्मशानवैराग्य टिकले असते का? तो रानावनांत जाता व तेथेही हरिणे-पाखरे मारू लागता व त्यांचे मांस मिटक्या मारून खाता! अर्जुनाची फजिती झाली असती. वृत्तीने, वैराग्याने, चिंतनाने खरी संन्यासभूमिका सिद्ध झाली नसताना केवळ लहर म्हणून संन्यासी होणे यात दंभ आला असता.
जी वृत्ती अद्याप आपल्या आत्म्याची झाली नाही, ती एकदम अंगीकारू पाहणे भयावहच आहे. अंतरंगी आसक्ती असलेल्याने संन्यस्त होणे, यात स्वत:चा व समाजाचा अध:पात आहे. मनात शिक्षणाची आस्था नसणा-याने शाळेत शिकविणे यात स्वत:लाही समाधान नाही, व राष्ट्रातील भावी पिढीचेच अपरंपार नुकसान आहे. आपला वर्ण समाजात कमी समजण्यात येत असला, तरी त्या वर्णानुरूप समाजाची सेवा करीत राहणे यातच विकास असतो. पाण्यापेक्षा दूध मोलवान आहे; परंतु मासा पाण्यातच वाढेल, दुधात जगणार नाही-
“यज्जीवन जीवन तो दुग्धीं वांचेल काय हो मीन?”
ज्या नेत्याने स्वत:च्या गुणधर्माप्रमाणे वागावे व समाजसेवा करावी.
संस्कृतात न्यायशास्त्रात धर्म शब्दाची व्याख्या विशिष्ट अर्थाने करण्यात येत असते. ज्याशिवाय पदार्थ असूच शकत नाही, ते धर्म होय. उदाहरणार्थ, जाळणे हा अग्नीचा धर्म होय. उष्णतेशिवाय अग्नी असूच शकत नाही. शीतलत्वाशिवाय पाणी संभवत नाही. प्रकाशण्याशिवाय सूर्याला अर्थ नाही. आपण सूर्याला जर म्हणू, “तू तपू नकोस”, तर तो म्हणेल, “मी न तपणे म्हणजे मी मरणे.” आपण वा-याला जर म्हणू, “तू वाहू नकोस”, तर तो म्हणेल, “मी वाहू नको तर काय करू? वाहणे म्हणजेच माझे जीवन.”
धर्म शब्दाचा हा अर्थ आहे. महात्माजींना विचारा, की “तुम्ही चरखा कातू नका”, तर ते म्हणतील, “मग मी जगेन कसा?” जपाहरलालांना विचारा, “पददलितांसाठी नका असे जिवाचे रान करू”; तर ते म्हणतील, “मग माझ्या श्वासोच्छवासाला अर्थ काय?”
ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही, ज्याच्यासाठी जगावे व मरावे असे वाटते, तो आपला वर्णधर्म होय. शेतक-याला म्हणा, “तू शेत पेरू नकोस, गाईगुरे पोसू नकोस, मोट हाकू नकोस” – त्याला कंटाळा येईल. शिक्षकाला – ख-या शिक्षकाला- मे महिन्याची सुट्टी कंटाळवाणी वाटते. शिकविणे हाच त्याचा परमानंद असतो. वाण्याला म्हणा. ‘दुकानात बसू नकोस; भाव काय आहे त्याची चौकशी करू नकोस’, तर त्याला जीवनात गोडी वाटणार नाही. आपल्या आवडीचे सेवेचे कर्म म्हणजे आपला प्राण होय. त्याच्यासाठी जगावे, मरावे असे वाटत असते.
असा जो स्वत:चा पर्ण, असा जो स्वत:चा सेवाधर्म, त्याच्यासाठी आपले सारे उद्योग असावेत. त्या वर्णाचा, त्या वर्णाचा, त्या आपण रात्रंदिवस प्रयत्न करून विकास करावा; आणि मेल्यावर देवाजवळ जाऊन म्हणावे, “देवा! हे भांडवल तू मला दिले होतेस त्याची अशी मी वाढ केली. त्या भांडवलाची वाढ करून मी समाजाला सुखी केले. समाजपुरुषाची मी पूजा केली.” देव संतोषेल व तुम्हांला हृदयाशी धरील.