प्रयोग करणारे ऋषी
भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती आहे. परंतु केवळ बुद्धीच नाही, तर हृदयाची हाक येथे ऐकिली जाईल. निर्मळ बुद्धी व निर्मळ हृदय ही वस्तुत: एकरूपच आहेत. निर्मळ बुद्धीत ओलावा असतो व निर्मळ हृदयात बुद्धीचा प्रकाश असतो. निर्मळ हृदय व निर्मळ बुद्धी यांच्या बळावर भारतीय संस्कृती उभारण्यात आली आहे.
उदार विचारावर ही संस्कृती आधारलेली असल्यामुळे तिच्यात शेकडो फेरबदल झालेले आहेत. धर्मात दोन भाग असतात. एक शाश्वत तत्त्वांचा भाग, व एक अशाश्वत तत्त्वांचा भाग. जगात सर्वत्र या दोन गोष्टी आपणांस दिसून येतील. आपले शरीर बदलत असते, परंतु आतील आत्मा तोच असतो. समाजातील व्यक्ती जन्मतात-मरतात; परंतु समाज चिरंतन आहे. नदीच्या प्रवाहातील जलबिंदू सारखे बदलत असतात; परंतु प्रवाह कायम असतो.
धर्मातील यमरूप भाग बदलत नसतो, परंतु नियमरूप भाग बदलत असतो. यम म्हणजे धर्मातील त्रिकालाबाधित भाग. सत्य, अहिंसा, संयम, दया, प्रेम, परोपकार, ब्रह्मचर्य इत्यादी गोष्टींना यम अशी संज्ञा आहे. संध्या करणे, स्नान करणे, खाणेपिणे, जानवे घालणे, गंध लावणे, हजामत करणे, इत्यादी गोष्टी नियमात येतात. यम म्हणजे अचल धर्म व नियम म्हणजे चल धर्म. स्मृतींतून स्वच्छ सांगितले आहे, की यमाचा विचार करता केवळ नियमांना जेव्हा महत्त्व प्राप्त होते, त्या वेळेस समाजाचा नाश होतो. परंतु या स्मृतिवचनाचे स्मरणही आम्हांस आज नाही! आज नियमांचे स्तोम आम्ही माजविले आहे. जानवे, गंध, शेंडी, यांचाच जणू धर्म बनला आहे! यमाची कदर आम्हांस नाही; नियम म्हणजेच आमचे सर्वस्व!
चल वस्तूला जेव्हा आम्ही अचल मानू लागतो व अचल वस्तूचे जेव्हा महत्त्व वाटत नाहीसे होते, तेव्हा धर्माचे सुंदर स्वरूप नष्ट होते. नियम आपणांस पदोपदी बाजूला ठेवावे लागत असतात. आपण ते बाजूला करीत नाही. परंतु आपले पूर्वज असे नव्हते. नियमांच्यावर यमधर्माचे अंकुशत्व ते सदैव ठेवीत असत.
एका काळी नियोगाची चाल धर्म म्हणून मानली जात होती. ज्या वेळेस आर्यावर्तात जमीन भरपूर होती व लोकसंख्याच फार कमी होती, त्या वेळेस नियोगाचा नियम करण्यात आला. परंतु पुढे हा नियम बदलण्यात आला. हा नियम नष्ट करण्यात आला. त्या त्या वेळचे विचार करणारे पुरुष समाजाचे नीट धारण व्हावे म्हणून त्या त्या काळाला उपयुक्त असे नियम करीत असतात. समाजात स्त्रियांची संख्या कमी असेल, तर अनेक पती मिळून एक पत्नी असा नीतिनियम करावा लागेल. समाजातील स्त्रियांची संख्या पुष्कळ व पुरुषांची कमी असेल, तर एका पुरुषाने अनेक स्त्रिया करण्यास हरकत नाही असा नियम होईल. अरबस्तानात महमदाला स्त्रियांची संख्या अधिक असल्यामुळे, बहुपत्नीकत्वाची चाल सांगावी लागली. ह्या चाली, ह्या रूढी, हे नियम तत्कालानुरूप असतात. समाजाची स्थिती बदलताच हे नियमही बदलतात.
प्राचीन काळातील इतिहास पाहिला, तर शेकडो फेरबदल आपणांस दिसतील. वेदकाळात बहीण व भाऊ यांच्या विवाहाचे उल्लेख आहेत. यम-यमी संवाद ह्यासाठी प्रसिद्ध आहे. यमी यमाला म्हणते, “भाऊ! तू माझ्याशी विवाहबद्ध का होत नाहीस?” यम म्हणतो, “पूर्वी तसे करीत. परंतु आता तसे करणे अधर्म मानले जाईल. लोक आपणांस नावे ठेवतील.” समाज नियमबद्ध होत होता. समाज प्रयोग करीत होता. एके ठिकाणी पुढील वचन आहे:
“सप्तमर्यादा कवयस्ततक्षु:”