महापुरुष म्हणजे पुंजीभूत विराट जनता. म्हणून बलवंत सरकारेही अशा महापुरुषाला वाकून असतात. महापुरुषांचे रक्त सांडणे सोपी गोष्ट नाही. संभाजीचे रक्त मोगली साम्राज्य धुळीला मिळवील. गुरू गोविंदसिंहाचे रक्त शिखांचे साम्राज्य उभारील.
विराटाच्या दरबारात अक्षक्रीडा चालली होती. खेळता खेळता संतापलेल्या विराटाने धर्मराजास फासा मारला होता. धर्माच्या कपाळातून भळाभळा रक्त वाहू लागले. धर्माने ते रक्त खाली पडू दिले नाही. सैरंध्री ताम्हन घेऊन आली. त्या ताम्हनात ते रक्त धरण्यात आले. धर्माला कोणी प्रश्न केला, 'आपण अंजुलीत रक्त का धरून ठेविले ? खाली पडले असते म्हणून काय बिघडले असते ?' धर्मराज म्हणाला, 'या रक्ताचा बिंदू जर जमिनीवर पडता, तर विराटाच्या राज्याचे भस्म होऊन गेले असते.'
अवतारी पुरुषाच्या रक्तातही शक्ती असते. ख्रिस्ताचे रक्त सांडण्यात आले, परंतु त्या रक्ताने जग जिंकले. अवतारी पुरुषांची ही प्रचंड शक्ती कधी कधी सत्तालोलुप लोक विसरतात. ते अवतारी पुरुषाचे रक्त सांडतात आणि ते रक्त सांडताच त्या सत्ताधीशांची सत्ता रसातळाला जाते. इतिहासाचा हा सिध्दान्त आहे. आपल्या प्रयत्नांची शर्थ करून असा अवतारी पुरुष जे बघतात ते धन्य होत. असा अवतारी पुरुष उत्पन्न होण्यासाठी जे आपल्या श्रमाचे सहकार्य करतात, जे एकत्र येतात, लहान-मोठे, स्त्री-पुरुष सर्व श्रेष्ठ-कनिष्ठपणा बाजूस सारून कर्मयज्ञ करतात, ते धन्य होत. हे महान सहकार्य होय. या कर्मात सर्वांना वाव आहे. पतित असोत वा पुण्यपावन असोत, या सर्वजण प्रयत्न करण्यासाठी. आपापल्या लहानशा कर्मांनी आपण महान पुरुषाला ओढून आणू. आपण कर्मांचे डोंगर उभारू, प्रयत्नांचे पर्वत रचू. कणाकणाचेच पर्वत असतात. हे सेवेचे व श्रमाचे पर्वत महापुरुषरूपी जीवनदायी मेघाला ओढून घेतील व समाज सुखी-समृध्द होईल.
भारतीय संस्कृती सांगते की, महापुरुष जन्मास यावा असे वाटत असेल तर स्वस्थ बसू नका. केवळ हरी हरी म्हणत खाटल्यावर बसल्याने श्रीहरी जन्माला येत नसतो. 'न हि ऋते श्रान्तस्य सख्याय देवा:। ' असे श्रुतिवचन आहे. जे दमले-भागले असतील अशांचाच प्रभू मित्र होतो, पाठीराखा होतो. जे श्रमत नाहीत, दिलेल्या हातापायांचा, हृदय-बुध्दीचा उपयोग करीत नाहीत, अशा कर्मशून्यांसाठी परमेश्वर उभा नसतो.
अवतारी पुरुष डोळ्यांनी पाहणे याहून भाग्य कोणते ? असा पुरुष आपली आशा असते; असा पुरुष आपले सामर्थ्य असते; अशा पुरुषाला पाहण्याचे आपणांस डोहाळे असतात. अशा विभूतीला पाहण्यासाठी डोळे भुकेलेले असतात. ईश्वराचा महिमा अशांकडूनच कळतो. मानवाचा महिमाही अशांकडूनच प्रकट होतो. मानवाची शक्ती महापुरुष दाखवून देत असतात. मनुष्याला किती उंच जाता येईल याची खूण असे महापुरुष करून ठेवितात.
भारतीय संस्कृतीत कर्मशून्यतेला, आलस्याला, नैराश्याला स्थान नाही. भारतीय संस्कृती म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा; भारतीय संस्कृती म्हणजे अमर आशावाद; भारतीय संस्कृती म्हणजे कोट्यवधी लहान-थोरांचे सहकार्य. अवतारकल्पनेत या सर्व गोष्टींचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आहे. ते सर्वांस ज्या दिवशी समजेल तो सुदिन !