ज्ञानदेवांनी सातशे वर्षांपू्र्वी भागवत धर्माचा पाया रचला, त्याप्रमाणे बौद्ध धर्माचा पाया आचार्य धर्मानंद कोसंबी यांनी रचला आहे. भागवत धर्म हजारो वर्षे ज्ञानदेवांपूर्वी प्रचलित होता, तरी त्याला पुन्हा नवा पाया देणे भाग पडले. त्याचप्रमाणे बौद्ध धर्म दोन हजार वर्षांपेक्षा अधिक कालपर्यंत निम्म्या मानवी जगात प्रचलित असूनही त्याला पुन्हा नवा पाया देण्याचे आवश्यक कार्य धर्मानंदांनी केले आहे. नवा पाया देण्याचे कारण, बौद्ध धर्माला या विज्ञाननिष्ठ व बुद्धिवादी नव्या युगाच्या प्रेरणांना अनुरूप स्वरूप देणे आवश्यक आहे, हे होय. अद्‍भुत पौराणिक कथा, कल्पित प्रसंग, आणि पारलौकिक तत्त्वज्ञान यांची शेकडो पुटे मूळच्या विवेकवादी शुद्ध बौद्ध धर्मावर आणि बुद्धचरित्रावर शतकानुशतके चढलेली आहेत, त्यामुळे नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असे त्याचे स्वरूप राहिलेले नाही. परंतु बुद्धचरित्राचे व बौद्ध धर्माचे मूळचे शुद्ध स्वरूप या नव्या युगाच्या प्रेरणांशी सुसंगत असेच आहे, असे ध्यानात आल्यामुळे अनेक आधुनिक पश्चिमी पंडितांनी व विशेषत: धर्मानंदांनी ते स्वरूप यशस्वी रीतीने विवेकबुद्धीने शोधून काढण्याचा प्रयत्‍न केला.

नव्या आधुनिक भारताला अशा मूळच्या शुद्ध स्वरूपातील बौद्ध धर्माची आणि बुद्धचरित्राची नितांत आवश्यकता आहे, कारण बुद्ध व बौद्ध धर्म ही जागतिक संस्कृतीला मिळालेली अलौकिक सर्वोत्त्तम देणगी असून ही भारताच्या प्राचीन इतिहासातील एक महान घटना आहे. या भूलोकातील मानवी संस्कृती अंतिम व शुद्ध नैतिक तत्त्वावर आधारलेली निर्माण करणे, हे आधुनिक मानवाचे आद्य व परमपवित्र कर्तव्य आहे. हे कर्तव्य बजावण्यात मानवाला अपयश आल्यास विज्ञानाच्या सामर्थ्यावर आधारलेल्या भौतिक संस्कृतीसह मानवजातीचा संसार विलयास जाण्याचा धोका उत्पन्न झालेला आहे. म्हणून या जगाला तारण्याकरिता बुद्ध व बौद्ध धर्म यांची गरज आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी, की गेल्या बाराशे वर्षांत भारतात बौद्ध धर्माला उतरती कळा लागून तो भारतातून नामशेष होत चालला होता. गेल्या दीडशे वर्षांत पश्चिमी इतिहाससंशोधकांच्या हे लक्षात आले की, या धर्माचा भारताच्या इतिहासातील धार्मिक, नैतिक, कलात्मक आणि तत्त्वज्ञानात्मक कार्याचा विस्तार हा मोठा होता. बौद्ध भिक्षूची दीक्षा घेतलेले भारतातील साधुसंत हजारो वर्षापूर्वी धार्मिक व नैतिक प्रेरणा घेऊन अर्ध्यापेक्षा अधिक जगात पसरले आणि त्यांनी नव्या नैतिक संस्कृतीचा संदेश देऊन मानवांना शांतीचा मार्ग दाखविला. पश्चिमी पंडितांनी संशोधन सुरू केल्यानंतर आधुनिक भारतीय पंडितही या प्राचीन इतिहासाच्या संशोधनास प्रवृत्त्त झाले. त्यांच्यातले अग्रणी म्हणजे आचार्य धर्मानंद होय.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel