११०. एका ब्राह्मणाचा भलताच ग्रह.

(चम्मसाटक जातक नं. ३२४)

प्राचीन काळीं वाराणसींत चर्मशाटक नांवाचा एक ब्राह्मण रहात असे. तो मानाला फार हपापलेला होता. एके दिवशीं रस्त्यांतून चालला असतां एक मदोन्नत्त एडका त्याच्यासमोर आला; आणि त्यावर टक्कर मारण्यासाठीं त्यानें मान खालीं घातली. तें पाहून ब्राह्मण म्हणाला, ''अहो ! या जनावरालादेखील किती शहाणपण आहे पहा ! हा माझ्यासारख्या सच्छील ब्राह्मणाला मान देण्यास उत्सुक दिसतो ! माणसालांच कमी अक्कल असते, असें म्हटलें पाहिजे ! हे ब्राह्मणाचे शब्द ऐकून जवळचा दुकानदार म्हणाला, ''भो ब्राह्मण ! थोड्याशा पूजेनें भुलून जाऊं नकोस ! आणि भलताच ग्रह करून घेऊं नकोस ! एडक्यानें जी खालीं मान घातली आहे ती तुझी पूजा करण्यासाठीं नसून तुझ्यावर चांगली जोराची टक्कर देण्यासाठीं होय ! तेव्हां लवकर येथून निघून जा.''

पण ह्या ब्राह्मणानें त्या दुकानदाराचें म्हणणें ऐकलें नाहीं, व तो तेथेंच उभा राहिला. एडक्यानें त्यावर अशी जोराची टक्कर मारली कीं, त्यायोगें तो गरंगळत गटारांत पडला ! त्याच्या बरगड्या मोडल्या, होमाचें साहित्य जिकडे तिकडे पसरलें, कमंडलू फुटून गेला, आणि जखमेंतून रक्त वाहूं लागलें. तेव्हां मोठ्यानें उसासा टाकून ब्राह्मण म्हणाला, ''मानाला हपापलेला मनुष्य असाच फजीत पावतो !''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel