८८. गोड बोलणारा गारुडी.

(सालकजातक नं. २४९)


एका गारुड्यानें सालक नांवाचा एक माकड पोसला होता. तो त्याला सापाबरोबर खेळवून पैसे मिळवीत असे. माकडानें कांहीं चूक केल्यास बांबूच्या काठीनें तो त्याला झोडून काढीत असे. एक दिवशीं गारुडी एका बागेंत सालकाला एका झाडास बांधून झोंपी गेला. ही संधी साधून माकडानें बांधलेली दोरी तोडून टाकली आणि तो एका उंच झाडाच्या शेंड्यावर जाऊन बसला. गारुडी जागा होऊन पहातो तों माकड बांधलेल्या ठिकाणाहून निसटून गेलेला ! इतस्ततः शोध केल्यावर त्याला तो झाडावर बसलेला आढळला. तेव्हां तो म्हणाला, ''बा सालका, तुला मी माझ्या पुत्राप्रमाणें समजतों. माझ्या मागून माझ्या कुळांतील सर्व संपत्ति मी तुलाच देऊन टाकण्याचा बेत केला आहे. तेव्हां मला शोकांत टाकून तूं असा निघून जाऊं नकोस ! ये खालीं उतर ! चला आपण घरीं जाऊं !''

सालक तेथूनच म्हणाला, ''या तुझ्या गोड शब्दाला मी भुलून जाणार असें तुला वाटतें काय ! बांबूच्या काठीचे प्रहार मी विसरलों नाहीं ! हें लक्षांत ठेव. मला तुझें धन नको आहे. तुझ्या सर्व संपत्तीपेक्षां स्वतंत्रपणें अरण्यात विहार करणें मला जास्त आवडतें ! तेव्हां तूं मुकाट्यानें येथून निघून जा. गोड बोलून मला वश करण्याच्या खटपटीला लागूं नकोस !''

असें बोलून माकडानें तेथून पलायन केलें. गारुडी दुःखित होऊन आपल्या घरीं गेला.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
८९. राजपुत्राला गुरुनें केलेला दंड.
(तिलमुट्ठीजातक नं. २५२)
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्राचीन काळीं वाराणसीच्या राजानें आपल्या पुत्राला एक हजार कार्षापण देऊन तक्षशिलेला अध्ययन करण्यास पाठविलें. वाराणसी नगरींत शास्त्री पंडित पुष्कळ होते. परंतु दूरदेशीं पाठविल्यानें मुलाचें शिक्षण उत्तम होऊन त्याला चांगली रीत लागेल, अशी राजाची समजूत होती. राजपुत्र मोठ्या परिवारासह तक्षशिलेला जाऊन तेथील सुप्रसिद्ध आचार्यांच्या घरीं विद्याध्ययनासाठीं गेला. त्यावेळीं तो आचार्य आपल्या शिष्यांना पाठ सांगून संपल्यावर घराच्या आवारांत इकडून तिकडे फिरत होता. राजपुत्रानें त्याला पाहिल्याबरोबर पायांतील वहाणा काढून आणि छत्री मिटवून बाजूला ठेविली, व जवळ जाऊन गुरूला नमस्कार करून तो एका बाजूला उभा राहिला. हा प्रवासांतून आलेला आहे असें जाणून आचार्यानें त्याचें योग्य आतिथ्य केलें. राजकुमाराचें जेवण वगैरे आटपल्यावर थोडी विश्रांती घेऊन तो पुनः गुरूजवळ गेला आणि नमस्कार करून एका बाजूला उभा राहिला. आचार्य म्हणाला, ''मुला, तूं कोठून आलास ?''

''गुरुजी मी वाराणसीहून आलों.''
''तुझ्या पित्याचें नांव काय ?''
''मी वाराणसी राजाचा पुत्र आहें.''''येथें कां आलास ?''
''गुरुजी मी आपल्या पायांपाशीं शास्त्राध्ययन करण्यासाठीं आलों आहे.''

आचार्य म्हणाला, ''तूं कांहीं गुरुदक्षिणा बरोबर आणिली आहेस किंवा गुरुसेवा करून अध्ययन करणार आहेस ?''

''गुरुजी, मी गुरुदक्षिणा आणिली आहे.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel