राजानें त्यांनीं सांगितलेल्या प्रमाणानें त्याचा उपयोग केल्यावर तो क्षणभर ब्रह्मानंदांत तल्लीन झाला व त्याला या पेयाची फार चटक लागली. परंतु नळकांड्यांतून आणलेलें ते किती दिवस पुरणार ! त्यांत सुराला आणि वरुणालाहि त्या पेयावाचून चैन पडत नसे. तेव्हां एक दोन दिवसांत सर्व पेय खलास झालें असल्यास नवल नाहीं.''

परंतु राजाश्रय चांगला मिळाल्यामुळें सुराला आणि वरुणाला मोठा उत्साह आला व हा धंदा त्यांनीं मोठ्या प्रमाणांत सुरू करण्याचें आरंभिलें. राजाकडून मोठमोठालीं मातीचीं मडकीं मागविलीं व त्या पेयाच्या तयारीला लागणारें तांदळाचें पीठ, हरडे वगैरे पदार्थ राजाच्या कोठारांतून घेऊन त्यापासून निरनिराळ्या प्रकारची दारू तयार केली. प्रथमतः हें पेय सुरानें पाहिलें म्हणून त्याला सुरा हें नाव देण्यांत आलें आणि वरुणानें तें कशा उपायांनीं बनवितां येईल याचा शोध लाविला म्हणून त्याला वारुणी असें म्हणूं लागले.

या सुरेचा किंवा वारुणीचा त्या शहरांतील लोकांवर थोडक्या कालांत विलक्षण परिणाम घडून आला. लोकांचीं धान्याची कोठारें मुलाबाळांच्या उपयोगी पडण्याऐवजी वरुणतपस्व्याच्या भट्टींत जाऊं लागली. व तेथें उत्पन्न झालेल्या वारुणीनें सर्व लोक मदोन्नत होऊन आपला धंदा सोडून मारामारी, शिवीगाळ, अभद्र भाषण वगैरे करण्यांत गुंतून गेले. तात्पर्य, थोडक्या कालांत या सुसमृद्ध प्रदेशांत दुष्काळ भासूं लागला. जमीन सुपीक असून पीक येईनासें झालें व धान्य असलें तरी बायकापोरें उपाशी पडूं लागली. रावापासून रंकापर्यंत वरुणॠषीचे भक्त बनले व वारुणीदेवीच्या नादीं लागले.

परंतु येथील कांहीं वृद्ध माणसांचीं डोकीं या नवीन देवतेनें इतकीं घेरलीं नव्हती. विचाराचा थोडा अंश त्यांच्यात अद्यापि शाबूद राहिला होता. आपल्या या दुर्दशेचें कारण काय ? जें राष्ट्र थोड्या कालापूर्वी सुसंपन्न होतें तें एकाएकीं दरिद्री कसें झालें ! ज्या आमची सभ्यपणानें वागण्यांत ख्याती होती तेच आम्ही अश्लील कसे बनलों ! जे आम्ही आपल्या स्त्रियांना गृहदेवताप्रमाणें मान देत असूं तेच त्यांना मारहाण करूं लागलों, या सर्वाचें कारण काय ? असा विचार मधून मधून कां होईना त्यांच्या डोक्यांत उद्भवणें साहजिक होतें.

या लोकांनीं स्वतः वारुणीचें पान करणें सोडून दिलेंच आणि तिच्या विरुद्ध इतकी चळवळ चालविली कीं राजाच्या प्रधानापर्यंत वारुणीचा तिटकारा उत्पन्न झाला. इतकेंच नव्हे एके दिवशीं गावांतील पुष्कळ लोकांनीं वरुण ॠषीच्या वारुणीच्या कारखान्यावर हल्ला करून तो उध्वस्त करून टाकिला. वरुणाचार्य आणि त्याचा मित्र सुर यांनी जवळच्या गवताच्या गंजीत आपली शरीरें झाकून जीव बचाविले आणि त्या रात्रीं तेथून पलायन केलें.

वरुण म्हणाला, ''भो मित्रा, हे लोक किती रानटी आहेत बरें ! त्यांच्यासाठीं आम्ही नवीन पेय शोधून काढलें असतां त्यांनीं बंड करून आमच्या जिवावर उठावें यासारखें लांछनास्पद दुसरें काय आहे. आतां परोपकाराची हाव सोडून देऊन चल आपण आपल्या आश्रमांत जाऊन राहूं.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel