१० उपेक्षापारमिता

आळशाला किती बोला, त्याची त्याला परवा नसते. कोणाच्या घराला आग लागली किंवा कोणाचें कितीहि नुकसान झालें, तरी त्याची तो परवा बाळगीत नाहीं. अशा स्वभावाला उपेक्षा म्हणत नाहींत; निर्लज्जता म्हणतात. आपण दुसर्‍याचें कल्याण करण्याचा प्रयत्‍न केला, आणि त्याकामीं त्यानें आपल्या मूर्खपणास विरोध केला, तर त्याची आपणास उपेक्षा केली पाहिजे. आज नाहीं उद्यां या माणसाला स्वतःचें हित कशांत आहे हें समजेल, अशा विचारानें तुम्ही त्याच्या विरोधाची परवा करतां कामा नये. दारूबाजाला दारूचें व्यसन सोडण्यास तुम्ही उपदेश करूं लागलां, तर तो खात्रीनें तुमचा शत्रू होईल. परंतु अशा प्रसंगीं तुम्ही त्याची उपेक्षा केली पाहिजे, व सौजन्यानें तुमचा प्रयत्‍न तसाच पुढें चालू ठेवला पाहिजे. मैत्रीनें आणि उत्साहानें लोककल्याणाच्या उद्योगाला तुम्ही लागलां, म्हणजे तुमच्यावर असे अनेक प्रसंग येतील कीं, त्या प्रसंगी उपेक्षापारमितेचा तुम्हाला फार फार उपयोग होईल, आणि म्हणूनच लहानपणापासून ती संपादण्याचा प्रयत्‍न तुम्ही केला पाहिजे.

मुलांनों, ह्या पुस्तकांत संग्रह केलेल्या कथांच्या वाचनानें वरील दहा पारमितांचा अभ्यास करण्याची तुम्हास गोडी लागली, तर माझ्या प्रयत्‍नाचें सार्थक झालें असे मी समजेन.
--------------------------------

आजला पांचसहा वर्षे ह्या कथा एका गृहस्थापाशीं तशाच पडून राहिल्या होत्या. त्यांच्या प्रसिद्धीचें सर्व श्रेय श्रीमुनि जिनविजयजी यांस आहे; आणि यासाठीं त्यांचा मी फार आभारी आहे. या भागाचीं प्रुफें पाहण्यांस रा. रंगनाथ दत्तात्रय वाडेकर यांनी फार मेहनत घेतली; याबद्दल त्यांचाहि मी फार आभारी आहे. छापण्याचें काम त्वरेनें करण्यांत आल्यामुळें, व येथून प्रुफें स्वतः पाहणें शक्य न झाल्यामुळें या पुस्ताकांत कांही चुका राहून गेल्या. त्यांबद्दल वाचक क्षमा करतील अशी आशा बाळगतों.

धर्मानंद कोसंबी

गुजरात पुरातत्त्व मंदिर.
अमदाबाद
संवत्सर प्रतिपदा
ता. ५ एप्रिल १९२४.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel