तेव्हां गवई म्हणाला, ''पण हे ब्राह्मणा, तूं माझ्याजवळ दागिना कधीं दिलास ?''

पुरोहित म्हणाला, ''आमच्याजवळ तूं असलास तर आमची करमणूक करूं शकशील व त्यामुळें कैदेंत देखील सुखानें काळ घालवितां येईल म्हणून तुलाहि मीं या माळें गोविलें.''

दासी म्हणाली, ''अहो दुष्ट गवईबुवा, तुमची आणि माझी ओळख तरी आहे काय ? मला तुम्ही दागिना दिलात कधीं ?''

गवई म्हणाला, ''बाई रागावूं नकोस. आम्हा चौघांबरोबर, तूं असलीस म्हणजे आमच्या सेवेंत अंतर पडणार नाहीं. एवढ्याचसाठीं मीं तुझें नांव सांगितलें.''

बोधिसत्त्वाच्या गुप्‍त हेरांनीं हा सर्व संवाद ऐकून घेतला, व बोधिसत्त्वाला कळविला. बोधिसत्त्वाची हे लोक निरपराधी असल्याबद्दल आगाऊच खात्री होऊन चुकली होती. कां कीं उद्यानाच्या बाहेर असलेल्या माणसाच्या हातीं पहारेकर्‍यांच्या तावडींतून सुटून एखादा दागिना जाणें असंभवनीय होतें. त्यांत बोधिसत्त्वाला या संवादाचा बळकट पुरावा सांपडला. परंतु चोरीचा थांग लावल्याशिवाय हें वर्तमान राजाला कळविणें इष्ट नव्हतें. तेव्हां बोधिसत्त्वानें विचाराअंती एखाद्या वानरीनें मुक्तहार चोरला असावा असें अनुमान केलें व दुसरें दिवशीं प्रतीति पाहण्यासाठीं खोटे दागिने करवून ते त्या उद्यानांत आपल्या विश्वासू नोकरांकडून पसरविले. प्रत्येक वानरीनें एकेक दागिना उचलून आपल्या गळ्यांत घातला, व त्या इकडून तिकडून मिरवूं लागल्या. ज्या वानरीला मुक्तहार सांपडला होता तिनें मात्र त्यांतील दागिना घेतला नाहीं. तेव्हां त्या इतर वानरी तिच्याजवळ जाऊन तिला म्हणाल्या, ''काय तूं येथें आळशासारखी बसली आहेस. हे पहा आमचे अलंकार !''

ती वानरी स्पर्धेनें म्हणाली, ''असले घाणेरडे दागिने घेऊन काय करावयाचे आहेत ? मजपाशीं जो दागिना आहे तो पाहिला तर तुम्हांला असले भिकारडे दागिने घालून मिरविण्यास लाजच वाटेल.'' असें म्हणून तिनें वळचणींतुन मुक्तहार बाहेर काढला, व आपल्या गळ्यांत घालून त्या सर्व मर्कटीसमोर मोठ्या डौलानें इकडून तिकडे मिरवूं लागली.

बोधिसत्त्वानें दागिने घेऊन वानरी काय करतात हें पाहण्यासाठीं आपले हेर तेथे ठेविलेच होते. त्यांनीं मुक्तहार वानरीच्या गळ्यांत पाहिल्याबरोबर तिला घेरलें. बिचारी मर्कटी त्यांच्या शस्त्रास्त्रांनी आणि आरडाओरडीनें घाबरून गेली, व तिनें तो हार तेथेंच जमिनीवर फेकून देऊन पळ काढिला. त्या हेरांनीं तो हार बोधिसत्त्वाकडे नेला, व त्यानें तो राजाला दिला. राजानें सर्व वृत्तांत ऐकून घेऊन बोधिसत्त्वाची फार तारीफ केली व तो म्हणाला, ''संग्रामात * शूराची योजना करावी; मंत्री मंडळांत जो मंत्राचा भेद करणार नाहीं अशाचीच योजना करावी; जेवण्याखाण्यांत आवडत्या माणसांना आमंत्रण करावें; पण अत्यंत कठीण प्रसंगी शहाण्याचीच योजना करावी असें जें लोक म्हणत असतात तें खोटें नाहीं. आज तुझ्याच पांडित्यानें चोरीचा पत्ता लागून निरपराधी माणसांचा माझ्याकडून छळ झाला नाहीं.''
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा -
उक्कठ्ठे सूरमिच्छन्ति मन्तीसु अकुतूहलं ।
प्रियं च अन्नपानह्मि अत्थे जाते च पण्डितं ॥
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
याप्रमाणें बोधिसत्त्वाची स्तुती करून राजानें त्याला मोठें बक्षीस दिलें व आजन्म त्याच्या सल्ल्यानें दानधर्मादिक सत्कृत्यें करून पुष्कळ कीर्ति मिळविली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel