४१. अतिपांडित्याचा परिणाम.

(कूटवाणिज जातक नं. ९८)

एकदां बोधिसत्त्व वाराणसी नगरींत वणिजकुलांत जन्मला होता. त्याला पंडित हें नांव ठेवण्यांत आलें. दुसरा एक अतिपंडित नांवाचा समानवयस्क गृहस्थ वाराणसींत रहात होता. वयांत आल्यावर बोधिसत्त्वानें त्याचा भागीदार होऊन उद्योग धंदा करण्यास सुरुवात केली. त्यांत त्या दोघांना बराच फायदा झाला परंतु फायद्याची वांटणी करण्याची वेळ आली, तेव्हां अतिपंडित म्हणाला, ''मला दोन हिस्से मिळाले पाहिजेत, व तुला एक हिस्सा मिळाला पाहिजे.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''हें कसें ! आम्हा दोघांचेंहि भांडवल सारखेंच होतें. दोघांनींहि सारखीच मेहनत केली आहे, मग तुला दोन हिस्से, आणि मला एक हिस्सा काय म्हणून ?''

अतिपंडित म्हणाला, ''बाबारे, माझ्या नांवाची किंमत केवढी मोठी आहे हें पहा. तूं केवळ पंडित आहेस, आणि मी अतिपंडित आहे; व यासाठींच मला दोन हिस्से मिळणें रास्त आहे.''

अतिपंडिताच्या या तर्कवादानें बोधिसत्त्वाचें समाधान झालें नाहीं. तेव्हां अतिपंडितानें त्याची समजूत घालण्याची दुसरी एक युक्ति शोधून काढली. तो म्हणाला ''बा पंडिता, तुला जर माझें म्हणणें पटत नसेल तर आपण उद्यां या गांवाजवळ प्रसिद्ध असलेल्या एका वृक्षदेवतेजवळ जाऊं, व तिला आम्हा दोघांचेंहि म्हणणें काय आहे तें कळवूं ; आणि ती जसा निवाडा करील त्याप्रमाणें वागूं.''

दुसर्‍या दिवशीं अतिपंडितानें आपल्या वृद्ध पित्याला त्या ठरलेल्या ठिकाणीं वृक्षाच्या वळचणींत दडविलें, व त्याला काय काय बोलावें हे आगाऊच शिकवून ठेविलें. नंतर तो व त्याचा मित्र पंडित हे दोघे त्या वृक्षाजवळ जाऊन त्यांनी देवतेची प्रार्थना केली, व आपापलें म्हणणें कळवून निवाडा मागितला. अतिपंडिताच्या पित्यानें स्वर पालटून आपल्या मुलाच्या तर्फे न्याय दिला. तेव्हां बोधिसत्त्व आवेशयुक्त वाणीनें म्हणाला, ''ही देवता मोठी लबाड दिसते. हिला या ठिकाणीं राहूं देणें इष्ट नाहीं.''

असें बोलून त्यानें आसपास पडलेलीं लांकडें पाचोळा वगैरे गोळा करून त्या वृक्षाभोंवती पसरून त्याला आग लावून दिली. बिचारा अतिपंडिताचा बाप धुरानें गुदमरून गेला, व जळून जाण्याच्या भीतीनें एका फांदीला लोंबकळून त्यानें खाली उडी टाकिली; आणि तो म्हणाला, ''मुलगा पंडित झाला म्हणजे बस्स आहे; पण अतिपंडित नको ! माझा मुलगा अतिपंडित झाला म्हणून माझ्यावर आज फार भयंकर प्रसंग गुदरला ?''*
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा --
साधु खो पंडितो नाम नत्थेव अतिपंडितो ।
अतिपंडितेन पुत्तेन मनम्हि उपकूळितो ॥
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ही लबाडी उघडकीस आल्यामुळें अतिपंडिताला नफ्याचा अर्धा हिस्सा देऊन बोधिसत्त्वाशीं तडजोड करणें भाग पडलें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel